जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेने आजपासून हॉटेल, बार सुरू - जिल्हाधिकारी

विनोद बेदरकर
Monday, 5 October 2020

आदर्श कार्यप्रणाली अंतर्गत सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात रेस्‍टॉरंटमध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे, कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधित आढळल्यास तातडीने करावयाच्या कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश ‘एसओपी’मध्ये करण्यात आला आहे.

नाशिक : प्रतिबंधित क्षेत्र वगळून राज्यात रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास पर्यटन संचालनालयाने आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे. त्यानुसार सोमवार (ता.५)पासून जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेने हॉटेल, फूड कोर्टस्, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

तातडीने करावयाच्या कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचना

प्रशासनाने अनलॉक अंतर्गत सोमवारपासून पन्नास टक्के कामकाज सुरू करताना ग्राहकांनी गर्दी टाळून जागेचे पूर्व आरक्षण करावे. वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदींबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे, असेही अभिप्रेत धरले आहे. आदर्श कार्यप्रणाली अंतर्गत सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात रेस्‍टॉरंटमध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे, कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधित आढळल्यास तातडीने करावयाच्या कार्यवाहीच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश ‘एसओपी’मध्ये करण्यात आला आहे. 

बुफे-लाइव्ह कार्यक्रमांना परवानगी नाही 

नव्या नियमावलीत हॉटेल, बारसाठी नियम अधिक कडक केले असून, त्यात निर्जंतुकीकरणाला प्राधान्य दिले आहे. शिजवलेल्या पदार्थांना प्राधान्य देताना सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. टेबल, खुर्च्या, काउंटरचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे. प्लेट्स, चमचे, भांडी गरम पाण्यात जंतुनाशकांनी धुवावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेलची माहिती घ्यावी, करमणुकीच्या लाइव्ह कार्यक्रमास मनाई असेल. 

आदर्श कार्यप्रणालीतील प्रमुख नियम 

ग्राहकांची प्रवेशद्वारावर थर्मल तपासणी 
लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश 
सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे 
ग्राहकांनी मास्क लावलेला असेल, तरच प्रवेश 
ग्राहकांसाठी हँड सॅनिटाइझरची सोय 
डिजिटल माध्यमाद्वारे व्यवहाराला प्राधान्य 
कॅश काउंटरवर शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन 
खिडक्या खुल्या ठेवून एसीचा वापर टाळावा 
टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अंतर असावे 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

शासनाने जाहीर केलेल्या आदर्श कार्यप्रणालीनुसार (एसओपी) अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केला असून, आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था अणि संघटना यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा, १८९७ मधील अधिनियम व नियमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotels, bars starting from today with half capacity nashik marathi news