‘घर तिथे शौचालय’ मोहिमेला जिल्ह्यात प्रतिसाद! बेसलाईचे सर्वेक्षण

बाबासाहेब कदम
Monday, 25 January 2021

नाशिक जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्थानिक पातळीवर गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, तालुका समन्वयक व लोकसहभागाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 

बाणगाव बुद्रुक (नाशिक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या वैयक्तिक शौचालय योजनेंतर्गत ‘घर तिथे शौचालय’ मोहिमेस नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात बेसलाइनने केलेल्या सर्वेक्षणानुसार उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून तीन लाख ७६ हजार ७८० शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

जिल्हा परिषदेची मोलाची भूमिका 

राज्यात २०१२ च्या बेसलाइन सर्व्हेनुसार केवळ ४५ टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ५५ टक्के कुटुंबांसाठी शौचालये बांधण्याचे आवाहनात्मक काम होते. विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना ५० टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ घोषित करून २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केलेले होते. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ६० लाखांवर शौचालये बांधण्यात आली आहेत. शौचालय बांधकामासाठी संबंधित कुटुंबाला १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यासाठी चार हजार कोटींपेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

‘स्वच्छ भारत अभियान-१’मधील बेसलाइन सर्वेक्षण २०२० प्रमाणे जी कुटुंबे होती ती २०१८ मध्ये पूर्ण झाली आहेत. त्यानंतर राहिलेल्या ५० हजार कुटुंबांना लाभ दिला. ‘स्वच्छ भारत अभियान-२’नुसार नवीन तयार झालेल्या कुटुंबाची पडताळणी करून त्यांना लाभ देण्याची शासनाची भूमिका आहे. या अभियानात जिल्हा उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हास्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थांच्या सहभागामुळे हे शक्य झाले. - ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

नांदगाव तालुक्यात पंचायत समितीच्या स्वच्छ भारत विभागामार्फत ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबांनी बांधकाम केले आहे. आता ग्रामीण भागातील बरीचशी कुटुंबे शौचालयाचा वापर करीत आहेत. तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक यांनी चांगली मेहनत घेतली आहे. - भाऊसाहेब हिरे, सभापती, पंचायत समिती, नांदगाव  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House there toilet District response to campaigns nashik marathi news