esakal | VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह?
sakal

बोलून बातमी शोधा

corona second patient.jpg

साधारण दहा दिवसांपूर्वी लासलगाव परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, सोमवारी (ता. 6) आणखी एका रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे.

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे.

एकही रुग्ण नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता..पण..
नाशिकमध्ये यापूर्वी एकही रुग्ण नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, मात्र त्यानंतर साधारण दहा दिवसांपूर्वी लासलगाव परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर, सोमवारी (ता. 6) आणखी एका रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित 44 वर्षीय रुग्ण गेल्या 22 मार्चला आग्रा येथून प्रवास करून मनमाडमार्गे नाशिकमध्ये आला होता. उत्तर भारतातून आलेल्या प्रवाशांच्या यादीत नाव असल्याने पोलिसांनी त्यास गेल्या शनिवारी (ता. 4) ताब्यात घेऊन महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, तपासणीसाठी पाठविल्यानंतर प्रलंबित असलेल्या 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून, आणखी 13 रिपोर्ट प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला संबंधित रुग्ण मनोहरनगर, गोविंदनगर परिसरातील रहिवासी असून, रेल्वेचा ठेकेदार आहे. तो कामानिमित्त आग्रा येथे गेला होता. 22 मार्चला त्याने आग्रा ते मनमाड व तेथून नाशिक रोड असा रेल्वेप्रवास केल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या शनिवारीच स्वॅबचे नमुने धुळ्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते; परंतु तेथील कोरोना तपासणी किट संपल्याने तेथून सर्व नमुने परत नाशिकला व रविवारी (ता. 5) एकूण 35 नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट सोमवारी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णास आता जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात हलविण्यात आले असून, त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. दरम्यान, सोमवारी 13 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. कोरोना कक्षात सध्या 16 जणांवर उपचार सुरू असून, 13 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. 

प्रथम रुग्ण हा बेकरी व्यावसायिक
नाशिक जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण हा लासलगाव मध्ये राहणारा असून बेकरी व्यवसायिक आहे. हा रुग्ण बेकरीच्या कामासाठी मुंबई येथे दोन वेळा जाऊन आला असल्याची माहिती मिळते. यानंतर (ता.१२) मार्च रोजी त्याला खोकला, सर्दी आणि ताप आल्याने स्थानिक खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. डॉक्टरांकडून न्यूमोनिया झाल्याचे उपचारही सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने, त्याला लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. तिथून त्याला नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता, (ता.२९) मार्च रविवारी संध्याकाळी तपासणी अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
 
कोरोनाबाधिताचा सर्वत्र वावर 
पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना आरोग्य तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 22 मार्च ते 4 एप्रिल यादरम्यान त्याने स्वत:हून होम क्वारंटाइन होणे अपेक्षित असताना लेखानगर भाजी मार्केट, औषध दुकान आणि अपार्टमेंटचे वॉचमन, नागरिकांमध्ये त्याचा सर्रास वावर होता. त्यामुळे पोलिस व आरोग्य प्रशासनासमोर या काळात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. 

VIDEO : Breaking : नाशिकमध्ये दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह...जिल्हाधिकारीं कडून माहिती

कोणताही संकोच न बाळगता संपर्क साधावा

नाशिकमध्ये दुसरा कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही सुरू आहे. प्रशासनातर्फे पुनःपुन्हा आवाहन करीत आहोत, की परदेशातून वा दिल्लीकडून प्रवास करून नाशिक शहर-जिल्ह्यात आलेल्यांनी स्वत:हून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. असा प्रवास करणाऱ्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता त्यांनी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून आपणास कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करणे शक्‍य होऊ शकेल. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

go to top