इगतपुरी-त्र्यंबकला मुद्रांक शुल्कापोटी शासनाला साडेसात कोटींचा महसूल

गोपाळ शिंदे
Saturday, 10 October 2020

लॉकडाउन काळात हातातील पैसे खर्च झाले, नोकऱ्या गेलेल्या असतानाही इगतपुरी तालुक्यातील जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई-ठाणे-नाशिक परिसरातील ग्राहकांची मिळकती खरेदीसाठी इगतपुरी तालुक्यास पसंती असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक : (घोटी) मुंबई, ठाण्यातील झगमगाट सोडून पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आलेले नागरिक इगतपुरी परिसरात जमिनी खरेदी करत असून, लॉकडाउनमध्ये जमीन खरेदीचे उच्चांक मोडीत काढले आहेत. मे ते सप्टेंबरदरम्यान मुद्रांक शुल्कापोटी शासनाला पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला आहे. 

लॉकडाउन काळात जमीन खरेदी-विक्री जोरात 

इगतपुरी परिसरात आदिवासी भागाची सफर करताना निसर्गाच्या सानिध्यात एखादे फार्महाउस अथवा घर असावे, या इच्छेतून वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे मंडळी जमिनी खरेदीसाठी पुढे येत आहेत. लॉकडाउन काळात हातातील पैसे खर्च झाले, नोकऱ्या गेलेल्या असतानाही इगतपुरी तालुक्यातील जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई-ठाणे-नाशिक परिसरातील ग्राहकांची मिळकती खरेदीसाठी इगतपुरी तालुक्यास पसंती असल्याचे दिसून येत आहे. 

एक हजारांवर दस्त नोंदणी 

एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान एक हजार २०१ दस्त खरेदी-विक्री नोंद करण्यात आली. मेमध्ये ८५, जून- १९२, जुलै- २७३, ऑगस्ट- २९७, सप्टेंबर- ३५४ जागा खरेदी करण्यात आल्या. मुद्रांक शुल्कापोटी पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला. यातून जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषदेस मिळणाऱ्या टक्केवारीत वाढ झाली असली, तरी हा निधी खर्च कशा प्रकारे होतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. 

हेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

त्र्यंबक निबंधक कार्यालयात गर्दी 

त्र्यंबकेश्वर : मार्चपासून लॉकडाउनमुळे येथील अर्थकारण ठप्प असले, तरी सहाय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी उत्साह आहे. आर्थिक अडचणींमुळे तालुक्यातील मालमत्ता खरेदी-विक्री जोरात असून, छत्रपती शिवाजी चौकातील शिवनेरी इमारतीत नोंदणीसाठी वर्दळ असते. ४४८ दस्त नोंदणी झाली असून, मुद्रांक शुल्कापोटी शासनाला दोन कोटी २१ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता विक्रीची गती वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.  

हेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Igatpuri-Trimbak stamp duty Revenue of Rs 7.5 crore to the government nashik marathi news