'सगळ्या यंत्रणा एकत्रितपणे अवैध धंदे मोडून काढणार!' पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

विनोद बेदरकर
Wednesday, 21 October 2020

अवैध उत्खनन, वाळू चोरी, अवैध दारू, प्रवासी वाहतुकीचे गैरप्रकार, मटका, रोलेटपासून ते अन्न-औषध भेसळीपर्यंत आणि प्रदूषणापासून तर वनविषयक अवैध करनाम्यांपर्यंत सगळे अवैध धंदे मोडून काढण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.

नाशिक : ‘वर पैसे द्यावे लागतात’, असे सांगून शहर-जिल्ह्यात यापुढे अवैध धंदे चालणार नाहीत. आता सगळ्या यंत्रणा एकत्रितपणे अवैध धंदे मोडून काढतील. त्यासाठी सगळ्या यंत्रणांची एकत्रित व्यवस्था उभी केली जाणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. 

राज्यात नाशिक पटर्न तयार करण्याचाही निर्धार

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २०) जिल्ह्याधिकारी श्री. मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पोलिस आयुक्त श्री. पांडे, पोलिस अधीक्षक श्री. पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. अवैध धंदे मोडून काढण्यासाठी सगळ्या यंत्रणांची व्यवस्था (मेकॅनिझम) तयार करण्याचे ठरले. अवैध उत्खनन, वाळू चोरी, अवैध दारू, प्रवासी वाहतुकीचे गैरप्रकार, मटका, रोलेटपासून ते अन्न-औषध भेसळीपर्यंत आणि प्रदूषणापासून तर वनविषयक अवैध करनाम्यांपर्यंत सगळे अवैध धंदे मोडून काढण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात अशा एकत्रित कारवायांची व्यवस्था निर्माण करीत, राज्यात नाशिक पटर्न तयार करण्याचाही निर्धार बैठकीत करण्यात आला. 

 हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 

यापुढे सगळे विभाग एकत्रित कारवाया करणार आहेत. कुणी काय जबाबदारी घ्यायची, यावर बैठकीत चर्चा झाली. या यंत्रणेत महापालिकेचा समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रामाणिक प्रयत्न दिसला. असा प्रथमच वेगळा प्रयत्न होतोय. वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, हा जो कायम आरोप होतो, त्याला चांगले ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. -दीपक पांडे, पोलिस आयुक्त 

 हेही वाचा > हॉटेलमधील आचाऱ्याच्या मृत्यूचे गुढ रहस्य; संशयास्पद घटनेचा पोलीसांकडून शोध सुरू

* तक्रारींसाठी एकच नंबर 
* विविध विभागांची संयुक्त समिती 
* संयुक्त पथकच करणार कारवाई 
* सगळे विभाग प्रामाणिक राहणार 

प्रदूषण नियंत्रण, भू-माफियाचे काय? 

बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असले तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मात्र कुणी नव्हते. त्यामुळे गोदावरी प्रदूषणापासून तर रातोरात डोंगरच्या डोंगर गायब करणारी भू-मफियागिरी ही समिती कशी रोखणार? या प्रश्‍नावर समितीला तितकेच गंभीर उपाय करावे लागणार आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal trades will not continue Police, Collector claims nashik marathi news