अक्षरहीन...अंधारलेल्या कुटुंबात 'नाना'ने पेटविला ज्ञानाचा दिवा!...एकदा वाचाच

संदीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 July 2020

वडिलांचा पारंपरिक म्हशींच्या केशकर्तनाचा व्यवसाय, तर आई मजूर अशा अठराविश्व दारिद्य्राच्या परिस्थितीत नाना सकट याची जडणघडण झाली. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्याने झोकून देत अभ्यास केला. कष्टाचे चीज म्हणून नानाने महाविद्यालयात ७२ टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे.

नाशिक : (विराणे) वडिलांचा पारंपरिक म्हशींच्या केशकर्तनाचा व्यवसाय, तर आई मजूर अशा अठराविश्व दारिद्य्राच्या परिस्थितीत नाना सकट याची जडणघडण झाली. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्याने झोकून देत अभ्यास केला. कष्टाचे चीज म्हणून नानाने महाविद्यालयात ७२ टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यातून अक्षरहीन अशा अंधारलेल्या कुटुंबात ज्ञानाचा दिवा त्याने प्रज्वलित केला आहे.

असा केला संघर्ष...

बिकट परिस्थितीमुळे नाना शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर पायपीट करायचा. सुटीच्या दिवशी पारंपरिक व्यवसाय व मजुरी करत कुटुंबाचा गाढा हाकत होता. नाना हा निळगव्हाण (ता. मालेगाव) येथील मूळ रहिवासी. आई कल्पना शेतमजूर, तर वडील लक्ष्मण म्हशींच्या केशकर्तनाचा व्यवसाय करतात. मुलाची शिक्षणाची आवड बघत त्यांनी नानाला विराणे येथील महाविद्यालयात दाखल केले. येथून पाच किलोमीटर लुल्ले हे गाव नानाचे आजोळ. रोज तेथूनच नाना शिक्षणासाठी पायी ये-जा करायचा. परिस्थिती गरिबीची असल्याने सुटीच्या दिवशी मजुरी करताना, कधी पारंपरिक व्यवसायात वडील व मामांना मदत करायचा. यातूनच आपल्या शिक्षणाचा खर्च भागवायचा.

जिद्द व कमालीची चिकाटीच्या बळावर यश

जिद्द व कमालीची चिकाटी याच्या जोरावर नानाने वेळ मिळेल तसा अभ्यास सुरू ठेवला. परिस्थितीची जाणीव ठेवत वाट्टेल ते काम केले. त्याच्या यशाबद्दल प्राचार्य एन. आर. नांद्रे यांनी अभिनंदन केले. प्रा. सुनील काकडे, रावसाहेब पगारे, संतोष कट्यारे, गौतम देवरे, भगवान जगताप, देवेंद्र चव्हाण यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा > धक्कादायक! खासगी रुग्णालयांकडून कोविड उपचारात अनियमितता... कारवाईची शक्यता

समाजातील विद्यार्थ्यांनी गरिबीवर मात करून जिद्दीने अभ्यास करावा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघता बाहेरगावचे पुढील शिक्षण परवडणारे नसल्याने देशसेवेसाठी सैन्यात दाखल व्हायचे आहे. - नाना सकट

हेही वाचा > अखेर जिल्ह्यात 'हा' पर्याय वापरुन भातांच्या रोपांची लागवड...वाचा सविस्तर बातमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from illiterate family background nana got success in 12th exam nashik marathi news