कांदा निर्यातबंदी उठविल्याचे पडसाद! भावात उसळी; पाकच्या व्यवहारात ६१ कोटींचा दणका 

महेंद्र महाजन
Wednesday, 30 December 2020

भारताने निर्यातीचा निर्णय घेतल्याने घसरलेल्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकचा कांदा १५ रुपये किलो भावाने, तर नाशिकचा कांदा २५ रुपये किलो भावाने जगाच्या बाजारात पोचणार आहे. पण तिखटपणा आणि चवीमुळे जागतिक आयातदारांनी भारतीय कांद्याला पसंती देण्यास सुरवात केल्याने नाशिकमधून निर्यात होणाऱ्या कांद्याची पहिल्या दिवसाची मागणी ‘फुल्ल’ झाली आहे.

नाशिक : कांद्याची निर्यातबंदी उठविल्याचे पडसाद २४ तासांमध्ये बाजारपेठेत उमटले. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांदा दराने क्विंटलला सरासरी पाचशे रुपयांची उसळी घेतली. एवढेच नव्हे, तर भारताने १ जानेवारीपासून कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेताच, पाकच्या कांद्याच्या भावात टनाला १५० डॉलरने घसरण झाल्याने व्यवहाराला ६१ कोटींचा दणका बसला.

पाकच्या निर्यातदारांना भाव घसरल्याने तोटा 

पाकमधून निर्यात झालेल्या ६०० कंटेनर कांद्याची जगभरातील आयातदारांनी टनाला ५०० डॉलरने खरेदी केल्याने आयातदारांना १८ कोटींचा, तर पाकच्या निर्यातदारांना भाव घसरल्याने ४३ कोटींचा तोटा सहन करावा लागला. 
भारतातून आठवड्याला सर्वसाधारणपणे दीड हजार कंटेनर कांद्याची निर्यात होते. भारताने निर्यातीचा निर्णय घेतल्याने घसरलेल्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकचा कांदा १५ रुपये किलो भावाने, तर नाशिकचा कांदा २५ रुपये किलो भावाने जगाच्या बाजारात पोचणार आहे. पण तिखटपणा आणि चवीमुळे जागतिक आयातदारांनी भारतीय कांद्याला पसंती देण्यास सुरवात केल्याने नाशिकमधून निर्यात होणाऱ्या कांद्याची पहिल्या दिवसाची मागणी ‘फुल्ल’ झाली आहे. अशातच, सिंगापूरच्या २० फूट आकाराच्या कंटेनरचे भाडे ३०० डॉलरवरून मंगळवारी एक हजार २५ डॉलरपर्यंत पोचले होते. भाड्यात झालेल्या वाढीमुळे भारतीय कांद्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

चीनचा भाव २५ डॉलरने कमी 
कांद्याच्या आयातीचा केंद्र सरकारने सोमवारी (ता. २८) निर्णय घेतला आणि सगळ्यात पहिल्यांदा पाकिस्तानच्या कांद्याच्या भावात घसरण झाली. चीनच्या टनभर कांद्याचा भावसुद्धा २५ डॉलरने कमी झाला आहे. सोमवारी ४०० डॉलरला विकलेल्या कांद्याचा मंगळवारचा भाव ३७५ डॉलर राहिला. जागतिक बाजारपेठेत रस्सा खाणाऱ्या ग्राहकांची पसंती भारतीय कांद्याला मिळते. सुखे खाद्यपदार्थ पसंत करणारे ग्राहक चीन आणि हॉलंडचा कांदा वापरतात. अशातच, आता भारतीय कांदा दुबईमध्ये ७ ते ८ जानेवारीला, तर श्रीलंकेत ५ जानेवारीला पोचेल. दरम्यान, मुंबईच्या बंदरातून कंटेनरचे जहाजामधील भाडे वाढल्याने नाशिकमध्ये कांदा खरेदी केलेल्या निर्यातदारांनी तुतिकोरीन बंदरातून कांदा पाठविण्याचे ठरविले आहे. तुतिकोरीन बंदरातून कंटेनरचे भाडे ६०० ते ७०० डॉलर आकारले जात आहे. पण त्याच वेळी तुतिकोरीन बंदराकडे ट्रकने कांदा पाठविण्यासाठी एक लाख रुपयांचे भाडे मोजावे लागणार आहे. मुंबई आणि तुतिकोरीन बंदरातून भाड्याचा विचार करायचा झाल्यास जवळपास तीच स्थिती राहत असली, तरीही जहाजाचा सुरू होणारा प्रवास आणि जगाच्या बाजारपेठेत पोचण्याचा कमी कालावधी या कारणास्तव तुतिकोरीन बंदराला पसंती मिळू लागली आहे. 

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

लासलगाव-नांदगावमध्ये ६०० रुपयांची वाढ 
लासलगाव : येथील मुख्य बाजार समितीत क्विंटलला कांद्याच्या भावात ६०० रुपयांची तेजी राहिली. इथे मंगळवारी लाल कांद्याला क्विंटलला कमाल दोन हजार ६६८, तर सरासरी दोन हजार ४०० रुपये असा भाव मिळाला. अडीच महिन्यांनंतर कांद्याचा भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. 

कांद्याच्या भावात क्विंटलला ५०० रुपयांची उसळी 

नांदगाव : कांद्याच्या भावात मंगळवारी सहाशे ते साडेसहाशे रुपयांची तेजी राहिली. क्विंटलचा कमाल भाव दोन हजार ६३२, तर सरासरी दोन हजार ४५१ रुपये असा राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत साडेसहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. दुसरीकडे उन्हाळ कांद्याची आवक घटली असून, उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव एक हजार ४४१ रुपये असा राहिला. 

कांद्याच्या भावाची स्थिती (आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 
बाजारपेठ मंगळवार (ता. २९) सोमवार (ता. २८) 

लासलगाव २ हजार ४०० १ हजार ९५१ 
कळवण २ हजार २५० १ हजार ७०० 
चांदवड २ हजार १ हजार ६५० 
मनमाड २ हजार १०० १ हजार ६०० 
सटाणा १ हजार ८७५ १ हजार ५५० 
देवळा २ हजार ४०० १ हजार ९२५ 
उमराणे २ हजार २०० १ हजार ५५० 
नाशिक २ हजार ४५० १ हजार ५०० 
पिंपळगाव २ हजार २५१ १ हजार ७००  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact of remove ban on onion exports nashik marathi news