esakal | यंदा नवरात्रातही बांधल्या जाणार रेशीमगाठी! सप्टेंबर-ऑक्टोबरमधील 'या' तारखा निश्‍चित 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona had an impact on the wedding season this year nashik marathi news

विवाहसोहळ्यांचा मार्च ते जून हा चार महिन्यांचा हंगाम लॉकडाउनमुळे वाया गेला. त्यामुळे वाजंत्री, आचारी, मंडप, डेकोरेटर्स, मंगल कार्यालय, लॉन्स आदी घटकांवर मोठा परिणाम झाला.

यंदा नवरात्रातही बांधल्या जाणार रेशीमगाठी! सप्टेंबर-ऑक्टोबरमधील 'या' तारखा निश्‍चित 

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

नाशिक/मालेगाव : पितृपक्ष व अधिकमासामुळे दीड महिने विवाहसोहळ्यांना विराम मिळाला आहे. सध्या कोरोनामुळे कमी खर्चात लग्न उरकविण्याची मानसिकता दिसून येत आहे. दीड महिन्यानंतर पुन्हा विवाहाच्या तिथी सुरू होणार आहेत. यंदा नवरात्रोत्सवातही रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत.

नियोजित विवाह उरकून घेण्याकडे कल

१७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये १९, २१, २४, २५, २८, २९, ३० व ३१ या तारखांना लग्नाची धामधूम राहील. विवाहसोहळ्यांचा मार्च ते जून हा चार महिन्यांचा हंगाम लॉकडाउनमुळे वाया गेला. त्यामुळे वाजंत्री, आचारी, मंडप, डेकोरेटर्स, मंगल कार्यालय, लॉन्स आदी घटकांवर मोठा परिणाम झाला. विवाहच बंद असल्याने बाजारपेठांतील उलाढाल मंदावली. अनेकांनी नियोजित लग्नतिथी पुढे ढकल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे पाहून अनेकांनी जूननंतर मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडले. दिवाळी व त्यानंतरही कोरोनाच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही, अशी परिस्थिती असल्याने अनेकांनी आता नियोजित विवाह उरकून घेण्याचे ठरविले आहे. 

सप्टेंबर-ऑक्टोबरमधील तारखा निश्‍चित

पितृपक्ष व अधिकमासामुळे लग्नतिथी नाहीत. १९ ऑक्टोबरपासून विवाह सुरू होतील. त्यादृष्टीने या सोहळ्यांची तयारी सुरू झाली आहे. कोरोना कधी कमी होईल, याची शाश्‍वती नसल्यामुळे अनेक कुटुंबीयांनी दिवाळीनंतर होणाऱ्या तुलसीविवाहाची वाट न पाहता सप्टेंबर-ऑक्टोबरमधील तारखा निश्‍चित केल्या आहेत. सध्या बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. दळणवळण पूर्वपदावर येत आहे. लग्नसोहळ्यांमुळे उलाढाल वाढून बाजारपेठांना काही प्रमाणात का होईना झळाळी येऊ शकेल. 

अशा आहेत लग्नतिथी 
ऑक्टोबर - १९, २१, २४, २५, २८, २९, ३०, ३१ 
नोव्हेंबर - १२, १८, १९, २०, २१, २२, २७, ३० 
डिसेंबर - ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

वाजंत्रीच्या अपेक्षा उंचावल्या 

विवाहावर सांबळ, बॅन्ड, डीजे आदी वाजंत्रीचालकांची रोजीरोटी अवलंबून असते. सहा महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रम व विवाहसोहळ्यांमध्ये वाजंत्री बंद आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. एकट्या कसमादेत जवळपास दोनशेपेक्षा अधिक बॅन्ड आहेत. बँकांचे कर्ज काढून सुशिक्षित तरुणांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. अटी-शर्थींना आधीन राहून वाद्याला परवानगी देण्याचे सूतोवाच कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले होते. नवीन हंगाम सुरू होण्यास सव्वा महिन्याचा अवकाश आहे. एवढ्या कालावधीत शासन वाद्याला परवानगी देईल, अशी अपेक्षा असल्याने वाजंत्रीचालकांच्या तसेच या व्यवसायाशी निगडित सर्व घटकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

संपादन - ज्योती देवरे