शहरात सौरऊर्जा प्रकल्पासह नवीन रुग्णालय होणार; महासभेत सर्वानुमते मंजुरी

malegaon palika.jpg
malegaon palika.jpg

नाशिक : (मालेगाव) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग स्टेशनवर चौदाव्या वित्त आयोगातून २७ कोटी १४ लाख रुपयांचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणी, शहरातील वाडिया रुग्णालय पाडून सर्व सुविधांयुक्त नवीन रुग्णालय व अली अकबर रुग्णालयानजीक नवीन रुग्णालय बांधणे, तसेच प्रशासकीय इमारतीसाठी ३२० केव्ही क्षमतेच्या जनित्र खरेदीस मंगळवारी (ता. २०) महासभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. 

स्वच्छतेची कामे आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा ठराव 

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन महासभा झाली. उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव पंकज सोनवणे, शहर अभियंता कैलास बच्छाव, राजू खैरनार आदी सभास्थानी होते. सभेत हद्दवाढ भागाचा प्रारूप विकास आराखडा बनविण्याच्या कामास एक वर्षाची मुदतवाढ दिली. महापालिका क्षेत्रातील मिळकतींवरील नावात बदलासाठी आकारण्यात येणारी चार टक्के रक्कम कमी करण्याचा निर्णयही झाला. शहरात होणाऱ्या उड्डाणपुलाखाली हजारखोली भागाकडून जुन्या आग्रा रोडला भुयारी रस्ता (सबवे) करण्याचा, शहरातील स्वच्छतेची कामे आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा ठराव मंजूर केला. अग्निशमन दलासाठी नवीन वाहन खरेदी आवश्‍यक नसल्याने वाहन खरेदी न करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

आयुक्त महासभेला गैरहजर असल्याबद्दल नाराजी
 
उपमहापौर आहेर यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या ताब्यातील तळवाडे साठवण तलाव व सायणे येथील तलावात अनुक्रमे मातोश्री महिला स्वयंसहाय्यता समूह रावळगाव व राजगृह महिला बचतगटास मत्स्यपालनास परवानगीचा ठराव चर्चेनंतर मंजूर झाला. या ठरावाला महागठबंधन आघाडीच्या काही सदस्यांनी विरोध केला. विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना जागा देण्याचे ठराव तहकूब झाले. सोमवार बाजार भागातील भंगार बाजारानजीकचे गाळे गाळेधारकांना कायम खरेदीचा ठराव काही नगरसेवकांचा विरोध असताना मंजूर झाला. मदन गायकवाड यांनी आयुक्त महासभेला सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल नापसंती व्यक्त केली.

चर्चेत रशीद शेख, अस्लम अन्सारी, खालीद परवेज, मुश्‍तकीम डिग्निटी, युनुस ईसा, अमीन फारुक, जयप्रकाश बच्छाव, अमानतुल्ला पीर मोहंमद, अतिक कमाल आदींनी भाग घेतला. ऑनलाइन महासभेत आवाज न येणे, ठराव मंजूर झाला की नामंजूर याबाबत निश्‍चित माहिती न समजणे, अधिकारी माहिती देताना सदस्यांना ऐकू न येणे आदी तांत्रिक अडचणी या वेळीही आल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com