शाळा सुरू, पास बंद! विद्यार्थ्यांची मात्र प्रचंड गैरसोय, प्रवास खर्च पालकांना डोईजड  

राम खुर्दळ
Monday, 11 January 2021

शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेपर्यंत पोचण्यासाठी बससेवा अपुरी आहे. एसटीचे पास वितरणही बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाच्या खर्चाचा बोजा पालकांना सहन करावा लागत आहे. 

गिरणारे (जि.नाशिक) : शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेपर्यंत पोचण्यासाठी बससेवा अपुरी आहे. एसटीचे पास वितरणही बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाच्या खर्चाचा बोजा पालकांना सहन करावा लागत आहे. 

प्रवासाच्या खर्चाचा बोजा पालकांच्या डोईजड
दरम्यान, शहर बससेवा नाशिक महापालिका ताब्यात घेणार असल्याने एसटी महामंडळाने पाससेवा बंद ठेवली असल्याची चर्चा आहे, पण यात विद्यार्थी व पालक भरडला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश उगले-पाटील व ग्रामविकास संवाद मंचाचे ॲड. प्रभाकर वायचळे यांनी केला. गेल्या मार्चपासून कोरोनामुळे एसटी सेवा व शाळाही बंद होत्या. मात्र, शिक्षण विभागाने जानेवारी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी बससेवा अपुरी ठरत आहे. काही ठिकाणी बसच सुरू नाही. काही ठिकाणी खासगी वाहतुकदारांनी भाडे वाढविले असून, याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. एसटी- महापालिकेच्या वादात विद्यार्थ्यांना अडचण सहन करावी लागत आहे. पास मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या रोजच्या प्रवासाचा आर्थिक भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे, असे काही पालकांनी सांगितले. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांची गैरसोय, प्रवास खर्च पालकांना डोईजड 
शहरातील ३० किलोमीटरदरम्यान असलेली शहर बससेवा नाशिक महापालिका ताब्यात घेणार असल्याच्या वृतामुळे एसटी महामंडळही गोंधळले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. मात्र, जिल्हाभर एसटीच्या फेऱ्या अजूनही अपुऱ्याच आहेत. बऱ्याच ठिकाणी बंद आहेत. तिथे मैलोन् मैल विद्यार्थी पायीच शाळेत जात आहेत. याकडे एसटी महामंडळ, लोकप्रतिनिधी व महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, असे पालकांनी सांगितले. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

आमच्याकडे बससेवा पूर्णपणे बंद आहे. शहरात महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी पायी जातात. उपनगरापासून शाळेत जाण्यासाठी पास देणेही बंद आहे. अपुरी बससेवा, बहुतांश गावांना पास देणे बंद आहे. मग विद्यार्थ्यांना रोज लागणारे प्रवासाचे पैसे अडचणीत कुठून द्यायचे? शिक्षणमंत्री, शिक्षण संस्था, एसटी महामंडळ व लोकप्रतिनिधींना हे माहीत आहे काय? भरडला जातोय फक्त पालक. -विष्णू माळेकर, राज्य सचिव, वारकरी महासमिती  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inconvenience to students due to passes closed nashik marathi news