जिल्हाधिकारी म्हणताएत...'संयम दाखवून मालेगावचा लौकिक वाढवा...!'

suraj mandhare3.jpg
suraj mandhare3.jpg

नाशिक / मालेगाव : कोरोना विषाणूशी यशस्वीरीत्या लढण्याचे एक आगळेवेगळे उदाहरण मालेगाव शहराने सर्वांसमोर ठेवल्याने त्याचाच पुढचा टप्पा म्हणून बकरी ईदही अतिशय संयमाने साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी (ता. २२) केले. मालेगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

यांची होती उपस्थिती 

यावेळी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंह, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तहसीलदार चंद्रजित राजपूत, महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व नागरिक उपस्थित होते. 

योग्य ती खबरदारी घ्या 

आपण कोरोना या आजारापासून दूर झालो असलो, तरी अजून त्याचा धोका टळलेला नाही. सर्वांनी नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगतानाच श्री. मांढरे म्हणाले, की बकरी ईदच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी करू नये. सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. गेल्या चार महिन्यांत आपण सर्वधर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, तशीच बकरी ईददेखील साधेपणाने साजरी करावी. महापालिकेने आवश्यक व्यवस्था केली असून, प्रशासनामार्फत लागेल ती मदत केली जाईल. 

प्रदर्शन करण्याचे साधन नाही 

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून घरातच बकरी ईद साजरी करावी. सध्याच्या काळात निरोगी जीवन जगणे हे महत्त्वाचे आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगून ईदच्या शुभेच्छा दिल्या. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी बकरी ईदच्या संदर्भातील ऐतिहासिक दाखला देऊन बकरी ईद ही परमेश्वरावरील आपली श्रद्धा व्यक्त करण्याचे साधन असून, आपली श्रीमंती दाखविण्यासाठी साधनसामग्रीचे प्रदर्शन करण्याचे साधन नाही, असे स्पष्ट केले. 

निर्देश पालनाचे आवाहन 

यावेळी अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालेगावातील सामाजिक सलोख्याचे कौतुक केले. शांतता समितीचे सदस्य युसूफ इलियास, जमील अन्सारी, शफीक राणा, हिदायत उल्ला, रियाज अन्सारी, बशीर शाह, इम्तियाज इक्बाल, इस्माईल जमाली, केवळ आप्पा हिरे, हरी प्रसाद गुप्ता, सुनील चांगरे यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. 

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com