
नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सत्ताधारी भाजपच जबाबदार असून वैद्यकीय, मेडिकलबरोबरच कोरोनासंदर्भातील साहित्य खरेदी करण्यास जाणूनबुजून विलंब लावला जात आहे. शासनाकडून प्राप्त पावणेदोन कोटींचा निधी खर्च करण्यास विलंब लावायचा, तर दुसरीकडे निधी आला नसल्याची टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे. महापौर ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिला.
कुंभकर्णी झोप संबोधले जात असेल तर दुर्दैवच
महापौर कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी कुंभकर्ण झोपेतून जागा झाल्याची टीका शिवसेनेवर करताना राज्य शासन भाजपची सत्ता असल्याने महापालिकेला निधी देत नसल्याचा आरोप केला होता. त्याला गुरुवारी (ता. १६) श्री. बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले. श्री. बोरस्ते म्हणाले, राज्य सरकारने एक कोटी ७० लाखांचा निधी महापालिकेला दिला असून चार कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु महापौर कुलकर्णी याकडे सोयीनुसार दुर्लक्ष करत आहे. एका किटमागे नऊशे कोटी रुपये वाचत असताना महापौरांनी ठराव देण्यास विलंब केला. यावरून महापौरांची कोरोनासंदर्भातील संवेदनशीलता समोर आली. कोरोना काळात शिवसेना सुरवातीपासून भाजप सोबत असताना त्याला कुंभकर्णी झोप असे संबोधले जात असेल तर दुर्दैव आहे.
नाशिक बाजार समितीमध्येच का फैलावला?
अर्थसंकल्पात कोरोना लढाईसाठी आर्थिक तरतूद केली असताना प्रशासनाकडे विलंबाने ठराव दिला. एकीकडे निधी नाही म्हणून शासनाच्या नावाने बोटे मोडायचे. दुसरीकडे भाजप नगरसेवकांचे मानधन केंद्राच्या खात्यात जमा करायचे ही दुटप्पी भूमिका आहे. खासगी रुग्णालयांकडून लूट होत असताना शिवसेनेने ठाम भूमिका घेतल्याने वचक निर्माण झाला. भाजपच्या कुठल्या नेत्याने खासगी रुग्णालयांविरोधात भूमिका घेतली ते दाखवून द्यावे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आदर्श घ्यावा. अठरा लाख चाचण्या ग्रामीण भागात केल्या, परंतु शहरात रेमडेसिव्हर औषधांची टंचाई भाजपने निर्माण केली. लासलगाव किंवा जिल्ह्यातील इतर भागातील बाजार समित्यांमध्ये कोरोना फैलावला नाही. नाशिक बाजार समितीमध्येच का फैलावला, यावरून नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते.
फार्महाउसवरून फरांदेवर निशाणा
महापौर कुलकर्णी यांनी फार्महाउसवर बसण्यापेक्षा रस्त्यावर येण्याचे आवाहन केल्याने त्याला प्रत्युत्तर देताना श्री. बोरस्ते यांनी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आमचे फार्महाउस एकदा येऊन बघाच, असे आव्हान देताना भाजप नेत्यांच्या फार्महाउसप्रमाणे आमच्या फार्महाउसवर प्रसाद दिला जात नाही. केकही कापले जात नसल्याचा टोमणा मारला. आमच्या फार्महाउसवर महापौरांनीही येऊन मुक्काम करावा. त्यानंतर आम्हाला अनुभव कथन करण्याचा सल्ला दिला. शिवसेनेचे नगरसेवक तीन महिन्यांपासून रस्त्यावर उतरून झटत आहे. हे काम फार्महाउसवर बसून झाले नसते, असा उपरोधिक टोला मारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.