आततायीपणा ठरतोय जीवघेणा! बुडून मृत्युच्या घटनांत होतेय वाढ; एकापाठोपाठ घटनांनी अनेक प्रश्न निर्माण

girls drowned pond.jpg
girls drowned pond.jpg

नाशिक / देवळा : कोरोनामुळे आलेले बंदिस्त जीवन, शाळा-महाविद्यालये बंद, पर्यटन ठप्प यामुळे युवकवर्ग वैतागला आहे. मग दोन-चार मित्र एकत्र येत कुठेतरी जवळपास निसर्ग सानिध्यात जाण्याचा बेत ठरवतात. तिथे पाण्याचा स्रोत असेल तर मग पाण्याचा अंदाज नसला आणि नीट पोहता येत नसले तरीही पोहण्याचा मोह आवरता न आल्याने यातून काहीतरी अघटित घडते. गेल्या महिन्याभरात तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा चार पाण्यात बुडून मृत्यूच्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

बुडून मृत्युच्या घटनांत होतेय वाढ
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे छोटी-मोठी धरणे, तलाव, तळी, नदीतील डोह, विहिरी सध्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. खरेतर शेतीसाठी पाण्याचे हे स्रोत गरजेचे आहेत; पण मुलांच्या आततायीपणामुळे ते जीवघेणे ठरत आहेत. देवळा तालुक्यात गेल्या महिन्याभरात अशा चार व इतर तालुक्यांत अशा अनेक घटना घडल्याने यावर सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती उद्‍भवण्याची जास्त शक्यता आहे किंवा यापूर्वी तशा घटना घडल्या आहेत तिथे सावधगिरीचे फलक लावण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्हाभरात बुडून मरणाऱ्यांची घटना काहीतरी सांगून जात असली तरी बोध घ्यायला कुणीच तयार नसल्याचे चित्र आहे. 

पूर्वसूचना देणाऱ्या फलकांची गरज
पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे जिवावर बेतू शकते, हे माहीत असूनही मित्रांच्या आग्रहाखातर हकनाक मरणाच्या दारात पोचणाऱ्यांची संख्या कमी नाही. बैलपोळा, गणेशमूर्ती विसर्जन, सहल अशा पार्श्वभूमीवर कितीतरी जीव बळी पडतात. नशीब बलवत्तर असले तर वेळेवर मदत मिळून जीवदान मिळू शकते, नाहीतर ते चार-पाच मिनिटे जीवनरेषा पुसण्यास पुरेसे ठरतात. या मृत्यूच्या सापळ्यात कोण केव्हा अडकेल हे सांगणे कठीण असले, तरी सावधगिरीचा उपाय म्हणून तेथे पूर्वसूचना देणाऱ्या पाट्या व फलक लावण्याची खरी गरज आहे. 


बुडून मृत्यूच्या काही घटना 
चोरचावडी (दहीवड, ता. देवळा) येथील धबधब्यात दोन युवकांचा बुडून मृत्यू, वाखारी (ता. देवळा) येथील विहिरीच्या पाण्यात बुडून सैनिकाचा शेवट, रामेश्वर धरणावरील कालची घटना, कळवणजवळ गिरणा नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू, मालेगावजवळ गिरणा नदीत बुडणाऱ्यांची वाढती संख्या, अशा कितीतरी घटना पाहता याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

धबधबा असो की कोणतेही धरण-तलाव, अशा ठिकाणी जागृतीपर फलक, संदेश लावून धोक्याची जाणीव करून देण्याची गरज आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबत दखल घेतल्यास पुढील काळात अशा दुर्घटना घडणार नाहीत. -भारत कोठावदे, देवळा  

संपादन - ज्योती देवरे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com