'कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास वारसाला कंपनीत सामावून घ्यावे'; आमदार हिरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रमोद दंडगव्हाळ
Thursday, 24 September 2020

सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित फार्मा कंपनीबरोबरच इगतपुरी, गोंदे येथील तीन कंपन्यांमध्ये तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये रुग्ण आढळल्याने औद्योगिक क्षेत्रात दहशत आहे.

नाशिक/सिडको : कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा त्या परिवारातील किंवा त्या परिवाराने सुचविलेल्या व्यक्तीस कारखान्यात सामावून घ्यावे, अशा मागणीचे निवेदन आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, कामगार उपायुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

औद्योगिक क्षेत्रात दहशत

सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित फार्मा कंपनीबरोबरच इगतपुरी, गोंदे येथील तीन कंपन्यांमध्ये तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये रुग्ण आढळल्याने औद्योगिक क्षेत्रात दहशत आहे. कोरोनाचा संसर्ग उद्‍भवू नये यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व अटींचे उल्लंघन होत असल्यानेच औद्योगिक वसाहतीत संसर्ग वाढला आहे. सातपूर-अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहती मिळून पाच हजारांपेक्षा अधिक कारखाने आहेत. या कारखान्यांत लाखांवर कामगार काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

कामगारांच्या वारसांना धीर 

सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा बजावताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना सेवेते सामावून घेण्याचा नियम आहे; परंतु कंपनी कामगारांना कर्तव्य बजावताना मृत्यू झाला असेल, तर त्याच्या वारसांना सेवेत सामावून घेतले जात नाही. माझ्या मतदारसंघातील अनेक निष्पाप कामगारांचा कंपनीत काम करताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढावलेली आहे. अशा परिस्थितीत कामगारांच्या वारसांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सीमा हिरे आणि भाजप कामगार आघाडी शहराध्यक्ष हेमंत नेहते यांनी केली. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inheritance should be included in the company mla hire nashik marathi news