esakal | हप्ते थकल्याने खासगी वित्तीय संस्थेकडून कर्जदारास दमदाटी; पोलिसांनी दंडुका उगारताच नरमले कर्मचारी  
sakal

बोलून बातमी शोधा

rupees.jpeg

कोरोना काळात बॅंकांसह फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते वसूल करू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्जाचे हप्ते थकविले म्हणून एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला.

हप्ते थकल्याने खासगी वित्तीय संस्थेकडून कर्जदारास दमदाटी; पोलिसांनी दंडुका उगारताच नरमले कर्मचारी  

sakal_logo
By
दीपक आहिरे

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोरोना काळात बॅंकांसह फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते वसूल करू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्जाचे हप्ते थकविले म्हणून पिंपळगाव येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या समयसूचकतेने या प्रकरणावर माफीनाम्याने पदडा पडला. मात्र फायनान्स कंपन्यांची मुजोरगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

कर्जाच्या वसुलीसाठी दमदाटी
पिंपळगाव बसवंत येथील एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे पिंपळगाव बसस्थानकात दुकान आहे. कोरोना महामारीच्या आधी नाशिक येथील खासगी वित्तीय संस्थेकडून वैयक्तिक कर्ज घेतले होते. मात्र बससेवा बंद असल्याने त्याचा व्यवसाय ठप्प झाला. एसटी महामंडळाने बससेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा यशस्वी प्रयत्न केल्यानंतर या त्यास कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी चार पैसे हातात आले असताना खासगी वित्तीय संस्थेनेच्या अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी या व्यावसायिकास गुरुवारी संपर्क साधत पैशांची मागणी केली. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

पोलिसांनी दंडुका उगारताच कर्मचारी नरमले 
तीन महिन्यांचे हप्ते भरले नाही म्हणून फायनान्सच्या दोन कर्मचाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यास अरेरावी आणि दमदाटी करत पैशांसाठी थेट उचलून नेले. यादरम्यान या पदाधिकाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांना दूरध्वनी करुन बोलावले. श्री. काजळे यांनी वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. याचदरम्यान पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत या प्रकरणात हस्तक्षेप करत दोघा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र दिवाळी असल्याने आणि कर्जदाराने दिलदारपणा दाखवत तक्रार न केल्याने वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी माफी मागत या पदाधिकाऱ्यास पुन्हा त्याच्या बसस्थानकातील दुकानावरआणून सोडले. मात्र, फायनान्स कंपन्यांची मुजोरगिरी बघून अनेकांनी संताप व्यक्त केला. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची माघार

पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिकास हप्ते भरले नाही म्हणून श्रीराम फायनान्सकडून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, संबंधित व्यावसायिक राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने आणि त्याने सणामुळे तक्रार न केल्याने फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी माघार घेतली. - संजय महाजन, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत 

वित्तीय संस्थेकडून उडवाउडवीची उत्तरे 
पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायिकास श्रीराम फायनान्सकडून त्रास दिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली.