नाशिकच्या बनावट कंपन्या चौकशीच्या रडारवर; कर चुकवेगिरीसाठी डीजीजीआयतर्फे तपासणी

विक्रांत मते
Sunday, 22 November 2020

नागपूर झोनमधील जीएसटी महासंचनालय व नाशिक प्रादेशिक विभागाने गुरुवारी शहरातून एका बांधकाम व्यावसायिकाला बनावट पावत्यांवर खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली.

नाशिक : अस्तित्वात नसलेल्या कंपनीने जारी केलेल्या बनावट पावत्यांवर कर चुकवेगिरी (खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट) घेताना बनावट क्रेडिटचा उपयोग जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यासाठी केल्याच्या कारणावरून नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाला नागपूरच्या जीएसटी महासंचनालयाने अटक केल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ जीएसटी इन्टलीजन्स (डीजीजीआय)च्या रडारवर नाशिकच्या बनावट कंपन्या आल्या आहेत. 

हा मुद्दा गाजण्याची चिन्हे

नागपूर येथील कर चुकवेगिरीच्या प्रकरणात नागपूरच्या डीजीजीआय कार्यालयातर्फे नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचा शोध सुरू आहे. यानिमित्ताने महापालिकेचे विविध कामे व स्मार्टसिटीअंतर्गत संबंधित कंपनी सुरू असलेल्या गोदावरी नदी संदर्भातील कामांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. बनावट कंपनी दाखवून ही कामे लाटण्यात आल्याचा संशय निर्माण झाल्याने आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

महापालिका व स्मार्टसिटी कंपनीचा कारभार

नागपूर झोनमधील जीएसटी महासंचनालय व नाशिक प्रादेशिक विभागाने गुरुवारी शहरातून एका बांधकाम व्यावसायिकाला बनावट पावत्यांवर खोटे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर त्या व्यक्तीने नाशिक महापालिकेत काम केल्याची बाब समोर आली आहे. गोदावरी नदीवर सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त पुलांचे काम संबंधित कंपनीला मिळाले असून, ही कंपनी बनावट असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने पुन्हा एकदा शहरातील वादग्रस्त पुलाचे काम चर्चेत आले आहे. त्याशिवाय स्मार्टसिटीअंतर्गत गोदावरी नदी संदर्भात सुरू असलेल्या कामाशीदेखील बनावट कंपनी संबंधित असल्याने महापालिका व स्मार्टसिटी कंपनीने करोडो रुपयांची कामे देताना कंपनीचे कागदपत्र न तपासताच कामे दिली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा 

माजी पालकमंत्र्यांशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीचे महापालिकेवर वर्चस्व आहे. सध्या गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याचे काम सुरू असून, ते काम बनवाट कंपनीला दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वादग्रस्त पूल पुन्हा चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षांसाठी टीका करण्याची आयती संधी मिळाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation of fake companies in Nashik started nashik marathi news