Jayakwadi
Jayakwadi

चिंता मिटली! जायकवाडी भरल्याने नाशिक-नगरकर निश्‍चिंत; वाचा सविस्तर

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पट्ट्यात वरुणराजाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील धरणांमधील साठ्याची चिंताजनक परिस्थिती तयार झाली होती. अशातच, पुन्हा जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची वेळ येणार काय, अशी चिंता नाशिकप्रमाणेच नगरकरांमध्ये दाटून आली होती. आता मात्र जायकवाडी ७४ टक्के भरल्याने नाशिक-नगरकरांची यंदा जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची चिंता मिटली आहे.

२०१५ मध्ये दुष्काळ पडल्याने परिस्थिती चिघळली होती

जिल्ह्यात आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झाला आहे, तसेच मोठे आणि मध्यम अशा २४ प्रकल्पांमधील साठा ६४ टक्क्यांपर्यंत गेला आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्टपर्यंत ८८ टक्के साठा झाला होता. राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी यंदा नाशिक-नगरमधील गंगापूर, दारणा, प्रवरा, मुळा धरण समूहातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची आवश्‍यकता राहिली नसल्याची माहिती दिली. ते म्हणाले, की मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस स्वातंत्र्य दिनापूर्वी झाल्याने जायकवाडीचा साठा ७६ टीएमसी झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१६ मधील आदेशानुसार जायकवाडी धरणात ६५ टीएमसीपेक्षा अधिक साठा असल्यास पाणी सोडण्याची आवश्‍यकता नाही. जायकवाडीमध्ये समन्यायी पाणीवाटप कायदा २००५ नुसार पाणी सोडावे यासाठी मराठवाड्यातील काही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. २०१५ मध्ये दुष्काळ पडल्याने परिस्थिती चिघळली होती. नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद पाण्यावरून तयार झाला होता.

गोदावरी खोऱ्यात पाणी वळण्याचे निर्देश
नाशिक-नगर-मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ही व्यवस्था होईपर्यंत समन्यायी पाणीवापर कायदा २००५ नुसार मेंढेगिरी समितीच्या तक्ता ६ प्रमाणे दुष्काळी वर्षात पाणीवाटप करावे, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दमणगंगा-वैतरणा-उल्हास खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लागण्याची आवश्‍यकता आहे, असे श्री. जाधव यांनी म्हटले आहे.

दारणा, नांदूरमध्यमेश्‍वरचा विसर्ग कमी
पावसाने उसंत घेतल्याने पाणलोट क्षेत्रातील पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने दारणा आणि नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पालखेडमधून एक हजार ६५२, दारणामधून पाच हजार ३७८, भावलीतून २९०, नांदूरमध्यमेश्‍वरमधून सहा हजार ३१०, भोजापूरमधून ११४, हरणबारीमधून दोन हजार १०४, पुनंदमधून दोन हजार १८१ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नाशिककरांच्या पिण्याचे पाणी अवलंबून असलेल्या गंगापूरमधील साठा ८३ टक्के झाला आहे. याशिवाय गोदावरी एक्स्प्रेस कालव्यासाठी पाणी आवश्‍यकता असलेल्या मुकणेचा साठा ६३ टक्के झाला आहे.

इगतपुरी-पेठमध्ये अतिवृष्टी
इगतपुरीमध्ये पावसाचा जोर कमी झालेला असताना मंगळवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत ७८ मिलिमीटर, पेठमध्ये ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांत २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : नाशिक- १८, दिंडोरी- ९, त्र्यंबकेश्‍वर- २८, मालेगाव- १४, नांदगाव- ५, चांदवड- ५, कळवण- ३०, बागलाण- १०, सुरगाणा- ३१.३, देवळा- १८, निफाड- ४.२, सिन्नर- २, येवला- ६. 

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com