जेईई मेन्‍स परीक्षेला ९० टक्‍के उपस्‍थिती; आता लक्ष निकालाकडे

अरुण मलाणी
Thursday, 3 September 2020

परीक्षा कालावधीपर्यंत या पालकांनी केंद्राबाहेर ठाण मांडले होते. प्रवेशासाठी वेगवेगळ्या वेळा असल्‍याने प्रवेशावेळी फारशी गर्दी जाणवली नाही. परंतु पेपर सुटल्‍यानंतर परीक्षा केंद्र आवारात गर्दी झाली होती. बहुप्रतिक्षित अशी जेईई परीक्षा पार पडल्‍याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

नाशिक : बहुप्रतिक्षित जॉइंट एंट्रान्‍स एक्‍झाम मेन्‍स (जेईई मेन्‍स) परीक्षेला मंगळवार (ता.१)पासून देशभरात सुरवात झाली. नाशिकमध्ये पाच केंद्रांवर ही परीक्षा होत असून, दोन्‍ही दिवस सुमारे ९० टक्‍के विद्यार्थी परीक्षेस उपस्‍थित होते. मास्‍क, सॅनिटायझरचा विद्यार्थ्यांकडून सक्‍तीने वापर करण्यात आला. काठिण्य पातळी कमी असल्‍याने परीक्षा सुलभ गेल्‍याची भावना विद्यार्थ्यांनी व्‍यक्‍त केली. 

परीक्षा केंद्राच्‍या क्षमतेच्‍या निम्म्या विद्यार्थ्यांची आसन व्‍यवस्‍था

सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत ही परीक्षा होत आहे. मंगळवारपासून सुरू झालेली जेइर्ई मेन्‍सची परीक्षा रविवार (ता.६) पर्यंत चालणार आहे. कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राच्‍या क्षमतेच्‍या निम्म्या विद्यार्थ्यांची आसन व्‍यवस्‍था केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या वेळांत बोलविण्यापासून, थर्मल स्‍कॅनिंग व अन्‍य उपाययोजना केल्‍या जात आहेत. संगणकावर आधारित या परीक्षेला दोन दिवसांत ९० टक्‍के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अनेक विद्यार्थ्यांसोबत आलेले त्‍यांचे पालक परीक्षा केंद्राबाहेर उभे असल्‍याचे दृश्‍य पहायला मिळाले. परीक्षा कालावधीपर्यंत या पालकांनी केंद्राबाहेर ठाण मांडले होते. प्रवेशासाठी वेगवेगळ्या वेळा असल्‍याने प्रवेशावेळी फारशी गर्दी जाणवली नाही. परंतु पेपर सुटल्‍यानंतर परीक्षा केंद्र आवारात गर्दी झाली होती. बहुप्रतिक्षित अशी जेईई परीक्षा पार पडल्‍याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

विद्यार्थी म्हणाले... 

खूप दिवसांपासून परीक्षेची तयारी करत असल्‍याने एकदाची परीक्षा पार पडल्‍याचे समाधान आहे. करिअर घडविण्याच्‍या दृष्टीने परीक्षा घेणे महत्त्वाचे होते. परीक्षा केंद्रावरील व्‍यवस्‍था समाधानकारक वाटली. आता निकालाकडे लक्ष लागले आहे. - प्रभात सिंग, नाशिक 

परीक्षेची काठिण्य पातळी फारशी जाणवली नसल्‍याने चांगले गुण मिळण्याची अपेक्षा आहे. जेईई मेन्‍स परीक्षेतून पुढे नामांकित संस्‍थेत प्रवेशाचा प्रयत्‍न आहे. परीक्षा केंद्रावर सावधगिरीच्‍या सर्व उपाययोजना असल्‍याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली. - आशिष भदाणे, देवळा 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

पालक म्हणाले... 
 
विद्यार्थ्यांच्‍या करिअरच्‍या दृष्टीने परीक्षा होणे महत्त्वाचे होते. अन्‍यथा वर्ष वाया जाण्याची भीती आम्‍हाला लागून होती. त्‍यामुळे आज परीक्षा झाल्‍याचा आनंद आहे. - रवींद्र वाघ, लासलगाव 

परीक्षेला विलंब होत असल्‍याने विद्यार्थ्यांवर दडपण येत होते. त्‍यामुळे एकदाची परीक्षा झाली हे महत्त्वाचे आहे. आता पुढील प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांसह त्‍यांच्‍या पालकांचे लक्ष राहणार आहे. - सुभाष भामरे, अंबड  

संपादन - किशोरी वाघ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JEE Mains Exam 90% student attendance nashik marathi news