पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदत व विमा कवच द्या; अन्यथा तीव्र आंदोलन करणार

रोशन खैरनार
Friday, 18 September 2020

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे कार्यक्रमात ‘कोरोना योद्धे’ पत्रकारांचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत देऊन पत्रकारांना विमा कवच देण्याची घोषणा केली होती.

नाशिक/सटाणा : राज्यात ५०० हून अधिक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत २५ पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले आहेत. राज्य सरकारने घोषणा करूनही राज्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना सुरू केली. ही घोषणा हवेतच विरल्याने पत्रकार बांधवांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. शासनाने तत्काळ पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना ‘कोरोना योद्धे’ म्हणून पन्नास लाख रूपयांची तातडीची मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा बागलाण तालुका मराठी पत्रकार संघटनेने शुक्रवार (ता.१८) निवेदनाद्वारे दिला. 

राज्यात २५ पत्रकारांचे बळी

संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास देवरे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण तहसील कार्यालयासमोर राज्य शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केली. तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे कार्यक्रमात ‘कोरोना योद्धे’ पत्रकारांचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत देऊन पत्रकारांना विमा कवच देण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत कोरोनाने राज्यात २५ पत्रकारांचे बळी घेतले असले तरी एकाही पत्रकाराच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची काय दमडीचीही मदत सरकारकडून मिळालेली नाही तर विम्याबाबतही सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने पत्रकारांमध्ये संताप असल्याचे म्हटले आहे. यावेळी विश्वास चंद्रात्रे, सरचिटणीस रोशन खैरणार, संजय जाधव, कैलास येवला, सतीश कापडणीस, महेश भामरे, नीलेश गौतम, राकेश येवला, परिमल चंद्रात्रे, अरुण भामरे, संजय खैरणार, दीपक खैरणार, रोशन भामरे, शरद खैरणार, योगेश वाणी, उमेश पवार, शशिकांत कापडणीस, नंदकिशोर शेवाळे आदींसह पत्रकार उपस्थित होते. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

 
राज्यभरातील पत्रकारांनी तालुकास्तरावर आंदोलने करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मोबाइलवर लाखो एस.एम.एस. पाठवली आहेत. तसेच लाखो ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधणार आहोत. 
- यशवंत पवार, संस्थापक जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद मुंबई 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalists are demanding insurance cover nashik marathi news