छत्रपती शिवाजी स्‍टेडियमवर रंगला खो-खो सामन्‍यांचा थरार; स्‍पर्धेमध्ये चुरस वाढली

अरुण मलाणी
Sunday, 10 January 2021

सकाळच्‍या वेळी पावसाने उसंत घेतल्‍याने छत्रपती शिवाजी स्‍टेडियमवरील सामन्‍यांमध्ये चुरस बघायला मिळाली. झेप घेणाऱ्या खो-खोपटूंचा थरार क्रीडाप्रेमींना यानिमित्त अनुभवायला मिळाला. दरम्यान, ज्‍येष्ठ खेळाडूंनी स्‍पर्धेला भेट देत खो-खोपटूंना प्रोत्‍साहन दिले.

नाशिक : गेल्‍या दोन दिवसांपासून शहरातील पावसामुळे प्रभावित झालेल्‍या खो-खो लीग स्‍पर्धेला शनिवारी (ता. ९) सुरवात झाली. सकाळच्‍या वेळी पावसाने उसंत घेतल्‍याने छत्रपती शिवाजी स्‍टेडियमवरील सामन्‍यांमध्ये चुरस बघायला मिळाली. झेप घेणाऱ्या खो-खोपटूंचा थरार क्रीडाप्रेमींना यानिमित्त अनुभवायला मिळाला. दरम्यान, ज्‍येष्ठ खेळाडूंनी स्‍पर्धेला भेट देत खो-खोपटूंना प्रोत्‍साहन दिले. 

ज्‍येष्ठ खेळाडूंनी केले प्रोत्‍साहित 

दुसऱ्या खो-खो लीग स्‍पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते झाले. देशातील खो-खोचा विकास करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने खो-खोची मांडणी करण्याचा जिल्हा खो-खो संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद, अनुकरणीय असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. या वेळी क्रीडा मार्गदर्शक राजू शिंदे, राष्ट्रीय खेळाडू व जयहिंद क्रीडा मंडळ इचलकरंजी महिला संघाचे प्रशिक्षक अनिल गांजवे, महाराष्ट्र व मुंबई विद्यापीठाच्या खो-खो संघाचे मार्गदर्शक राष्ट्रीय खेळाडू दीपक राणे आदी उपस्थित होते. 

शनिवारच्‍या स्‍पर्धांचा निकाल असा 

दीपिका रेंजर्स विरुद्धच्या सामन्यात सोनाली हंटर संघाने १३ विरुद्ध ११ अशा दोन गुणांनी विजयी सलामी दिली. विजेत्या संघाकडून सोनाली पवारने ३.५५ व नाबाद १.५० सेकंदाचे संरक्षण करत आक्रमणात चार गडी बाद केले. तिला दीक्षा शिताड, दीदी ठाकरे व ताई पवार यांची चांगली साथ मिळाली. पराभूत संघाकडून रूपाली मेढे, मनीषा पडेर, ऋतुजा सहारे, सुषमा चौधरी व दीपिका बोरसे यांची चांगली खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. विजेत्या संघाने दिलेल्‍या खोमध्ये ३६ फाऊल झाले. पराभूत संघाने दिलेल्‍या ५१० खोमध्ये ४८ फाऊल झाले. 

यांची चांगली खेळी

दुसऱ्या सामन्यात मनोज सोल्जर्सने चेतानंद स्ट्राइकरचा २६ विरुद्ध २४ असा दोन गुणांनी पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. विजेत्या संघाकडून मनोज पवार १.१० व ५ गडी, चंदू चावरे १.५० व १ गडी, राज ठाकूर १.२० व १.५०, जगन फौजदार २ गडी यांनी चांगली खेळी केली. पराभूत संघाकडून दिलीप खांडवी, दीपक चारोस्कार, जगन यांनी चांगली खेळी केली. विजेत्या संघाने ४०० खो देताना, ३५ फाऊल झाले. पराभूत संघाने ४३७ खो देताना ४५ फाऊल झाले. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

स्पर्धेतील आव्हान कायम ठेवताना चेतानंद स्ट्राइकरने गणेश डिफेंडर्स संघाचा १८ विरुद्ध १६ असा दोन गुणांनी पराभव केला. विजेत्या संघाचा कर्णधार चेतानंद मडावीने १.४० व १.० मिनिटे व १ गडी, दीपक चारोस्कारने उत्‍कृष्ट प्रदर्शन केले. दिलीप खंडवीने आक्रमणात आठ गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून संजय गावित, वनराज जाधव, चिंतामण चौधरी यांनी चांगली खेळी केली. विजेत्या संघाने दिलेल्‍या ३४४ खोमध्ये १८ फाऊल होते. पराभूत संघाने दिलेल्‍या ४९६ खोमध्ये ४८ फाऊल झाले. स्पर्धेला जुने नामवंत खेळाडू युधिष्टिर वैद्य, विजय बुरकूल, ध्रुव वैद्य यांनी भेट दिली. संघटनेचे आजीवन अध्यक्ष रमेश भोसले यांनी सर्वांचे पुस्तक भेट देत स्वागत केले.  

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kho-Kho match is played at Chhatrapati Shivaji Stadium, Nashik marathi news