अखेर गूढ उलगडलेच! फ्री फायर गेमसाठी मित्रालाच संपवले; घटनेने परिसरात खळबळ

संजीव निकम
Monday, 30 November 2020

घरापासून शंभर मीटरच्या अंतरावरील एका खड्ड्यात आढळला होता. साध्या, सरळ जिभाऊचा खून झाल्याच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत होती. मात्र, जिभाऊचा मोबाईल गायब असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपासावर लक्ष केंद्रित करत जिभाऊच्या संपर्कातील तिघा-चौघा संशयितांना ताब्यात घेतले होते.

नाशिक : भौरी  (ता. नांदगाव) येथील खून प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावण्यात नांदगावच्या पोलिसांनी यश मिळविले. मोबाईलमधील ऑनलाइन फ्री फायर गेम खेळण्याच्या व्यसनाधीन असलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. वाचा सविस्तर प्रकार...

मोबाईल गायब असल्याने पोलिसांना संशय

शनिवारी (ता. २९) घरातून बाहेर पडलेल्या जिभाऊ मधुकर गायकवाड  (वय ३८) या  शेतकऱ्याचा चेहरा विद्रुप केलेल्या अवस्थेतील मृतदेह वडाळी रस्त्यानजीक  घरापासून शंभर मीटरच्या अंतरावरील एका खड्ड्यात आढळला होता. साध्या, सरळ जिभाऊचा खून झाल्याच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत होती. मात्र, जिभाऊचा मोबाईल गायब असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपासावर लक्ष केंद्रित करत जिभाऊच्या संपर्कातील तिघा-चौघा संशयितांना ताब्यात घेतले होते. सर्व प्रकारच्या शक्यता तपासून पाहात असताना पोलिसांना सुनील शिवाजी मोरे (वय १९) या तरुणाकडे संबंधित मोबाईल असल्याचे समजले. तसेच, सुनीलला मोबाईलवर  लाइन फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे तपासात निष्‍पण झाले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने जिभाऊची डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबुल केले.

संतापाच्या भरात दगडाने ठेचून जिभाऊचा खून

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सिद्धार्थ आहिरे यांनी ही कामगिरी केली. दरम्यान, जिभाऊ व सुनील हे दोघे मित्र असून, दोघेही भौरी गावात राहात होते. जिभाऊचा मोबाईल सुनीलने फ्री फायर गेम खेळण्यास मागितला. त्यास नकार मिळाल्याने त्याने संतापाच्या भरात दगडाने ठेचून जिभाऊचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killed a friend for playing games on mobile nashik marathi news