सौभाग्याचं लेणं ही हसलं! कुंकू कारखाने धुमधडाक्यात सुरु; आता देवाचे दार उघडण्याची प्रतीक्षा   

kunku.jpg
kunku.jpg

मालेगाव (जि.नाशिक) : भारतीय संस्कृतीत सौभाग्याचे लेणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंकवालाही आता देवाचे दार उघडण्याची प्रतीक्षा आहे. धार्मिक सण-उत्सव व सणासुदीच्या दिवसांत कुंकवाला मागणी वाढल्याने, तसेच मंदिर उघडण्याचे स्पष्ट संकेत शासनाकडून मिळाल्याने राज्यातील दीडशेपेक्षा अधिक कुंकू कारखाने पुन्हा मोठ्या जोमाने सुरू झाले आहेत. कोरोना लॉकडाउनमुळे आठ महिन्यांपासून कुंकवाचे उत्पादन बंद असल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला. कारखाने पुन्हा सुरू झाल्याने दहा हजारांवर मजुरांचा रोजीरोटीचा प्रश्‍न‍ही सुटला आहे. 

सप्तशृंगडाला प्रतीक्षा ; कुंकू कारखाने धुमधडाक्यात सुरू ​
कोरोनामुळे राज्यातील यात्रा-जत्रा, सण-उत्सव, गावागावांतील ग्रामदैवतांच्या यात्रा रद्द झाल्या. परिणामी लहान व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. आदिमायेच्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव रद्द झाल्याने चारशेपेक्षा अधिक पूजेचे साहित्य विक्री करणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मंदिर बंद असल्याने गडावर शुकशुकाट असून, सर्वांनाच मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे. उन्हाळ्यातील यात्रा-जत्रांच्या भरवशावर तयार केलेल्या मालाचे कोरोनामुळे नुकसान झाले. गुदामात अर्ध्यापेक्षा अधिक माल खराब झाला. या परिस्थितीतून कुंकू व्यावसायिक बाहेर पडत आहेत. नवरात्रापासून कुंकवाला मागणी वाढली आहे. त्यामुळे कुंकवाबरोबरच दीपोत्सातील रांगोळीसाठी पिवळा, गुलाबी, हिरवा, निळा, चॉकलेटी, केसरी रंग बनविण्याचे काम सध्या कारखान्यांमध्ये होत आहे. राज्यातील एकूण कुंकू कारखान्यांपैकी निम्मे कारखाने एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. 

व्यवसायाला मिळेल बळकटी 
मंदिर व धार्मिक स्थळे दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यामुळे कुंकू व इतर प्रसादाच्या वस्तू बनविल्या जात आहेत. मोठ्या कालावधीनंतर मंदिरे उघडणार असल्याने भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी होऊन कुंकू व प्रसाद साहित्याला मागणी वाढेल. या पार्श्वभूमीवर हळूहळू उत्पादन वाढू लागले आहे. त्याचबरोबर मजुरांना रोजीरोटी मिळत आहे. मंदिरे उघडल्यानंतर या व्यवसायाला बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. धार्मिक स्थळांवर लाखो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. 

दहा टक्क्यांनी भाव घसरला 
कोरोनामुळे धार्मिक स्थळे व देवस्थाने आठ महिन्यांपासून बंद आहेत. याचा मोठा परिणाम कुंकू, बुक्का व प्रसादाचे साहित्य विक्री करणाऱ्या घटकांवर झाला आहे. मागणी बऱ्यापैकी वाढू लागल्याने हा व्यवसाय पुन्हा बळकटी धरू लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने कुंकवाचे घाऊक भाव दहा टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या वर्षी ७० रुपये किलोला मिळणारा कुंकू यंदा ६५ रुपये किलोने विकला जात आहे. 
 

धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी.

नवरात्रोत्सवापासून राज्यातील कुंकू कारखाने हळूहळू सुरू झाले. राज्यभर कारखाने सुरू झाले असले तरी पूर्ण क्षमतेने अजून उत्पादन घेत नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेने भाव थोडे कमी असले तरी धार्मिक स्थळे सुरू झाल्यानंतर मागणी वाढून भाव स्थिर होतील. शासनाने शक्य तेवढ्या लवकर धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी. -वसीम काजी संचालक, श्री पांडुरंग कुंकू, बुक्का उत्पादक वर्क्स, पंढरपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com