पिंपळकोठेत बिबट्याचा थरार; जनावरांच्या गोठ्यातून केलं जेरबंद

दीपक खैरनार
Sunday, 11 October 2020

पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील शेतकरी पोपट भामरे यांची गावालगत जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे (गट क्र. १२१) मध्ये शेती आहे. त्यांच्या घरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने काही मोजके पाहुणे उपस्थित होते. घराच्या भिंतीला लागूनच जनावरे व शेतीपयोगी वस्तूसाठी बंदिस्त गोठा आहे. पहाटे चारच्या सुमारास गोठ्यात जोरजोरात आवाज येत असल्याने शेतकरी पोपट भामरे यांना जाग आली. 

नाशिक /अंबासन : पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील शेतकरी पोपट भामरे यांची गावालगत जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे (गट क्र. १२१) मध्ये शेती आहे. त्यांच्या घरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने काही मोजके पाहुणे उपस्थित होते. घराच्या भिंतीला लागूनच जनावरे व शेतीपयोगी वस्तूसाठी बंदिस्त गोठा आहे. पहाटे चारच्या सुमारास गोठ्यात जोरजोरात आवाज येत असल्याने शेतकरी पोपट भामरे यांना जाग आली. 

भामरे यांनी गोठ्याकडे येत गोठ्याचा दरवाजा उघडताच गोठ्यातील कोंबड्या आणि शेळ्या बाहेर पडल्या. भामरे यांना संशय आल्याने त्यांनी गोठ्यात टॉर्चने पाहिले असता त्यांना गोठ्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेला बिबट्या दिसला. त्यांनी मोठ्या हिंमतीने गोठ्याचा दरवाजा बंद करत ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांना संपूर्ण घटना सांगितली.

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले

माहिती मिळताच विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जाळीला लोखंडी पत्रे आडवे करीत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आणि काही तासांतच बिबट्या जेरबंद झाला. जनावरांच्या गोठ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्यास जेरबंद करण्यास अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. बिबट्या जेरबंद होताच सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.  वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे यांच्यासह रूपेश दुसाने, के. आर. बोरसे, पी. आर. परदेशी, आकाश कोळी, अक्षय हेंबाडे, संगीता चौरे, श्रीमती बहिरम, रेणुका आहिरे, वर्षा सोनवणे, दिलीप खेमनार, राजेंद्र साळुंखे, जगन आहिरे, जिभाऊ आहिरे, कैलास पवार, ग्रामसेवक योगेश भामरे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard was caught from a cattle shed at Pimpalkothe nashik marathi news