ग्रीन कॉरिडॉरद्वारे यकृत पुण्याला रवाना; मेंदूमृत विनायक यांच्‍या अवयवदानातून सहा रुग्‍णांना जीवदान 

अरुण मलाणी
Monday, 28 December 2020

विनायक काळमेख मेंदूमृत झाल्‍याचे जाहीर करण्यात आले. यानंतर त्‍यांच्‍या पत्‍नी सरोजिनी काळमेख, बंधू चंद्रशेखर काळमेख आणि पुतण्या अनय काळमेख यांच्‍यासह कुटुंबीयांनी सामाजिक जाणीव ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला.

नाशिक : अपघातानंतर उपचारादरम्‍यान विनायक सुधाकर काळमेख (वय ६१) यांना मेंदूमृत घोषित केल्‍यानंतर, त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी स्‍वयंस्‍फूर्तीने अवयवदानाचा निर्णय घेतला. यातून रविवारी (ता. २७) सायंकाळी पावणेसहाच्‍या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात ग्रीन कॉरिडॉरने यकृत रवाना झाले, तर दान केलेल्‍या दोन मूत्रपिंडांची नाशिकमध्येच प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया झाली. दोन डोळे व त्‍वचा दान केल्‍याने सहाहून अधिक रुग्‍णांना जीवदान मिळाले आहे. 

मेंदूमृत विनायक काळमेख यांच्‍या अवयवदानातून सहा रुग्‍णांना जीवदान 
सिन्नर येथील व साईबाबा पतसंस्‍थेत कार्यरत असलेले विनायक सुधाकर काळमेख गेल्‍या २४ डिसेंबरला पतसंस्‍थेच्‍या लेखापरीक्षणाशी निगडित कामानिमित्त सिन्नरहून नाशिकला येत होते. यादरम्‍यान शिंदे गावाजवळ त्‍यांच्‍या दुचाकीचा अपघात झाला होता. जखमी अवस्‍थेत असताना तेथून जात असलेल्‍या डॉ. संदीप खिवंसरा यांनी त्‍यांना नजीकच्‍या रुग्‍णालयात दाखल केले व तेथे त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. दरम्‍यान, विनायक काळमेख मेंदूमृत झाल्‍याचे शनिवारी (ता. २६) जाहीर करण्यात आले. यानंतर त्‍यांच्‍या पत्‍नी सरोजिनी काळमेख, बंधू चंद्रशेखर काळमेख आणि पुतण्या अनय काळमेख यांच्‍यासह कुटुंबीयांनी सामाजिक जाणीव ठेवत अवयवदानाचा निर्णय घेतला. यानंतर पुढील प्रक्रिया गंगापूर रोडवरील हृषीकेश हॉस्‍पिटल आणि रिसर्च सेंटर येथे राबविण्यात आली. 

ग्रीन कॉरिडॉरच्‍या माध्यमातून यकृत रवाना
दरम्‍यान, वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्‍यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात ग्रीन कॉरिडॉरच्‍या माध्यमातून यकृत रवाना झाले, तर हृषीकेश हॉस्‍पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्यात येणार होती. दोन डोळे सुशील आय केअरला, तर त्‍वचा वेदांत हॉस्‍पिटल येथील स्‍किन बँकमध्ये दान केली जाणार आहे. दरम्‍यान, ग्रीन कॉरिडॉरच्‍या वेळी काळमेख कुटुंबीय रुग्‍णालय आवारात उपस्‍थित होते. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

कोविड, सलग सुट्यांमुळे अन्‍य अवयवांचे दान नाही 
दरम्‍यान, कोविड-१९ ची परिस्‍थिती व सलग आलेल्‍या सुट्यांमुळे अन्‍य अवयव प्रत्‍यारोपणासाठी आवश्‍यक रुग्‍ण पोचू न शकल्‍याने या अवयवांचे दान करता आले नसल्‍याचे तज्‍ज्ञांनी सांगितले. हृदय, आतडे आणि फुफ्फुस दान करता येणे शक्‍य होते, परंतु निर्धारित वेळेत प्रत्‍यारोपण प्रक्रिया होणार नसल्‍याने हे अवयवदान केले नसल्‍याचे सांगितले. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

काका पतसंस्‍थेच्‍या कामानिमित्त नाशिकला येत असताना झालेल्‍या अपघातात मेंदूमृत झाले. कुटुंबीयांशी चर्चा करताना सामाजिक जाणिवेतून आम्‍ही अवयवदानाचा निर्णय घेतला. अन्‍य रुग्‍णांच्‍या रूपाने आमच्‍या काकांचे या जगात अस्‍तित्‍व असल्‍याचे समाधान राहील. -अनय काळमेख, नातेवाईक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liver shipped to Pune via Green Corridor nashik marathi news