काळजी घेणार नसेल, तर पुन्हा लॉकडाउन.. भुजबळांची ताकीद

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 July 2020

कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करावे. आठ दिवसात नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही, तर कठोर पावले उचलावीत, प्रसंगी लॉकडाउन करण्यात येईल, रुग्ण अधिक असलेल्या भागात संचारबंदी कडक करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नाशिक / येवला : कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करावे. आठ दिवसात नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही, तर कठोर पावले उचलावीत, प्रसंगी लॉकडाउन करण्यात येईल, रुग्ण अधिक असलेल्या भागात संचारबंदी कडक करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आपापले काम चोख बजावण्याबाबत अधिकाऱ्यांना तंबी दिली. 

काळजी घेणार नसेल, तर येवल्यात पुन्हा लॉकडाउन 
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की येवला तालुक्‍यात घरोघरी होणारे सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात येऊन कंटेन्मेंट झोनमध्ये कडक नियोजन करण्यात यावे, मास्क न वापरणाऱ्यासह नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जर एवढे करूनही नागरिक ऐकत नसतील, तर वेळप्रसंगी पूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. यांसह लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना बाभूळगाव येथे पाठविण्यात यावे, ऑक्‍सिजन बेडसवर डीसीएचसीमध्ये अतिदक्षता घ्यावयाच्या रुग्णांना ठेवून समुपदेशन करण्यात यावे, नगरसूल येथे संपूर्ण 28 खाटांना कायमस्वरूपी ऑक्‍सिजनची व्यवस्था करावी त्याचबरोबर येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या. 

काळा बाजार व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा - भुजबळ

येवल्याला कर्जमाफीची 150 कोटी, तर निफाड तालुक्‍याला 133 कोटी रुपये रक्कम प्राप्त होणार असून, ही संपूर्ण रक्कम पीककर्जासाठी वितरित करावी; अन्यथा जबाबदारी निश्‍चित करून कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. गोडाऊन भाड्याने घेऊन सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी करावी, खरेदी प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी काट्यांची संख्या वाढवावी व खरेदी प्रक्रिया बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. काळा बाजार व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा अन्‌ शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्या, असे आदेश त्यांनी दिले. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

आठ दिवसांत नियंत्रण मिळविण्याच्या सूचना​

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत भुजबळ यांनी येथील संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे आदी उपस्थित होते. संपर्क कार्यालयप्रमुख बाळासाहेब लोखंडे, अरुण थोरात, वसंत पवार, गटनेते मोहन शेलार, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, साहेबराव मढवई, नवनाथ काळे, सचिन कळमकर, बाळासाहेब गुंड, प्रसाद पाटील, भाऊसाहेब धनवटे, ज्ञानेश्‍वर दराडे, सुभाष गांगुर्डे, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, डॉ. संदीप कराड, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी, निरीक्षक खंडेराव रंजवे, सहायक निबंधक एकनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in yeola again don't care nashik marathi news