कुस्तीचे स्वप्न बघणारं शरीर आजाराने ग्रासलं; पक्षीप्रेमाने दिली जगण्याची उमेद अन् उंच भरारी

amol chandorin1.jpg
amol chandorin1.jpg

चांदोरी (जि.नाशिक) : नववीत असताना त्याला दुर्धर आजार जडला. हातांची थरथर, बोलतानाही होणारी अडचण, कुस्तीचे स्वप्न बघणारं शरीर हळूहळू कमकुवत होऊ पाहत असताना शिक्षण व कुटुंब सांभाळत त्याने पक्षीप्रेम जोपासले. याच प्रेमाने त्याला जगण्याची उमेद दिली अन् उंच भरारी घेण्याचीही...

दुर्धर आजाराशी झुंज देत पक्षीप्रेम जपणारा अमोल 

दुर्धर आजाराशी झुंज देत असताना अमोल दराडे सध्या नांदुरमध्यमेशवर येथे गाइड म्हणूनही काम करतोय; पण संकटावर मात करत नैराश्याला झटकत आकाश कवेत घेण्याची प्रेरणाही तो पर्यटकांना देतोय. 
चापडगाव (ता. निफाड) येथील अमोल यांची घरची परिस्थिती बेताचीच. पहिल्यापासून कुस्तीची आवड, यात्रेनिमित्त ठिकठिकाणी कुस्त्या खेळताना गंगाधर आघाव यांच्याशी ओळख झाली. त्यातून सुरू झाली पक्ष्यांसोबतची मैत्री, जखमी पक्ष्यांवर उपचार करून पुन्हा सोडून देणं यांसह इतर. याचदरम्यान नववीला असताना अमोलला ‘मस्कुलर डिस्ट्रॉफी’ने ग्रासले. या आजारमुळे शरीर कमकुवत व्हायला सुरवात झाली. परंतु अमोल मनाने दिवसेंदिवस खंबीर होत गेला. त्याने सायखेडा येथील महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू ठेवले. 

२६५ हून अधिक पक्ष्यांची खडान्‌खडा माहिती 

निफाड तालुक्यात गोदावरी व कादवाच्या संगमावर बांधलेल्या धरणामुळे या भागात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. नांदूरमध्यमेश्वर परिसरात अमोल दराडे १२ वर्षांहून अधिक दिवसांपासून अभयारण्यात गाइड म्हणून काम करतात. १२ वर्षांत अमोलने प्रा. आनंद बोरा, विश्‍वरूप राहा यासारख्या पक्षी निरीक्षकांकडून विविध माहिती गोळा केली. त्यामुळे अमोल या भागाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. स्थलांतरित होऊन येणाऱ्या पक्ष्यांबद्दल तो पर्यटकांसोबत सहजपणे संवाद साधत आहे. आजाराने दिव्यांग येऊन पक्षी निरीक्षण व पर्यटकांना माहिती देण्याची त्याची जिद्द कायम आहे. 
या भागात स्थलांतरित होऊन येणाऱ्या जवळपास २६५ पक्ष्यांची नावं, त्यांचा विणीचा हंगाम, त्यांची वैशिष्ट्ये या सगळ्यांची माहिती तो खडान्‌खडा देतो. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

उपजीविकेचा नवीन पर्याय 
अमोल नांदूरमध्यमेश्‍वर येथे गाइडचे काम करताना गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, शंकर लोखंडे, रोशन पोटे, अमोल डोंगरे, पंकज चव्हाण, ओंकार चव्हाण आदी सहकाऱ्यांना पक्ष्यांची माहिती देऊन उपजीविकेचा नवीन पर्याय शोधला आहे. डिसेंबरमध्ये पक्षी स्थलांतरास सुरवात झाली, की चांगले उत्पन्न मिळते. 

जीवनात संकटही येणारच, त्यांचा विचार करत बसलो, तर आहे ते आयुष्यही जगता येणार नाही. त्यामुळे आहे त्यात समाधान मानून प्रगती करत राहावी. - अमोल दराडे, गाइड, नांदूरमध्येमश्‍वर 

अमोल दराडे यांनी मनोबलाच्या जोरावर आपल्या व्याधीवर यश मिळवले असून, इतरांसाठी ते एक प्रेरणास्रोत आहेत. संकुलात नियमितपणे सकाळपासून सायंकाळपर्यंत ते पर्यटकांना पक्ष्यांबद्दल माहिती देत असतात. - अशोक काळे, वनमंडळ अधिकारी ,नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com