ते म्हणाले.."आम्ही छगन भुजबळ यांच्या कार्यालयातून आलो...पण फोन लावताच ठोकली धूम" असे काय घडले?

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 15 July 2020

कोरोनामुळे सध्या मार्च महिन्यपासून गरीबांना मोफत धान्य वितरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात आहेत. त्यात प्रामाणिक दुकानदारांनाही त्रास होतो. अनेक तोतया मंडळी अधिकारी, मंत्री यांची नावे घेत अगदी खंडणी मागण्यापर्यंत मजल गेली आहे.​

नाशिक : स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानासमोर एक वाहन येऊन थांबले, त्यातून दोन महिला आणि दोन पुरुष उतरले. त्यांनी "सोनवणे यांना तुम्ही गोरगरीब नागरिकांना धान्य देत नाही. त्यांना धमकावतात. धान्य वाटपाबाबत थेट मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत तक्रारी आल्या आहेत." त्यामुळे आम्ही पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या कार्यालयातून स्पेशल स्क्वॉड म्हणून आलो आहोत. तुमचे दुकान सील करण्यात येणार आहे, असे धमकावले. हा सारा प्रकार शिंगावे (ता. शिरपूर) येथे घडला. पण त्यानंतर जे काही झाले ते अजबच होते.

`हे नको असेल तर, दोन लाख द्यावे लागतील`

सोमवारी (ता.१३) येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय सोनवणे यांच्या दुकानासमोर एक वाहन येऊन थांबले, त्यातून दोन महिला आणि दोन पुरुष उतरले. त्यांनी सोनवणे यांना तुम्ही गोरगरीब नागरिकांना धान्य देत नाही. त्यांना धमकावतात. धान्य वाटपाबाबत थेट मंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आम्ही पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या कार्यालयातून स्पेशल स्क्वॉड म्हणून आलो आहोत. तुमचे दुकान सील करण्यात येणार आहे, असे धमकावले. त्यातील एकाने सोनवणे यांना बाजुला घेऊन `हे नको असेल तर, दोन लाख द्यावे लागतील` असे सांगितले. या चौघांचा रुबाब अन् भाषा कानावर पडल्यावर प्रारंभी तर दुकानदार गांगरूनच गेला होता. त्याने सावधानता म्हणून तहसीलदार कार्यालयाशी संपर्क केला. असले काही पथक आले आहे का? याची विचारणा केली. कार्यालयातून असे कोणतेही पथक आले नसल्याचे सांगण्यात आले. दुकानदार फोनवर बरीच चौकशी करीत असल्याचे पाहून हे चौघे सावध झाले. त्यांनी आता काही खरे नाही, असा विचार करुन ते आले तसेत वाहनात बसले आणि धूम ठोकली. आता पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! ऑटो गॅरेज, कोल्ड्रींक्स अन् मोबाईलच्या दुकानात चोरीछुपे सुरू प्रकार...शोध घेताच मोठा खुलासा

तोतया पथकाचा पोलीसांकडून शोध

यासंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला माहिती देण्यात आली, तेव्हा यावर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर दुकानदार पाटील याने शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  आता पोलिस तोतया पथकाच्या त्या चौघा सदस्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा > आम्हाला पैसे दे.. नाहीतर पुलावरून फेकून देऊ" उड्डाणपुलावरील प्रकार पाहून पोलीसही थक्क

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lying in the name of the food and supplies department case filed nashik marathi news