परवानगी मिळूनही मका खरेदीच्या पोर्टलला टाळेच; शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने विक्री

संतोष विंचू
Wednesday, 13 January 2021

मका खरेदीला मर्यादित उद्दिष्ट दिल्याने जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक हजार ८२३ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली तर अचानक बंद झाल्याने विक्रीच्या प्रतीक्षेतील सात हजार ४१९ शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. 

येवला (नाशिक) : केंद्र व राज्य शासनाच्या गोंधळात तब्बल पंचवीस दिवस बंद असलेले शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेची मका खरेदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. मात्र चोवीस तास उलटूनही अद्याप या खरेदीचे पोर्टल बंदच असून, परिणामी खरेदीदार संस्थांना मंगळवारी (ता. १२) दिवसभरात मका खरेदी सुरू करता आली नाही. दुसरीकडे नावनोंदणी केलेल्या सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांपैकी निम्मे शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने मका विक्री केला असून, ज्यांच्याकडे मका आहे ते मात्र आता खरेदीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

निम्म्या शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने विक्री 

शासकीय आधारभूत मका खरेदीला २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली, तर जिल्ह्यात साधारणतः १८ नोव्हेंबरपासून मका खरेदी सुरू झाली अन् ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत असताना ऑनलाइन पोर्टल बंद होऊन मका खरेदीला ब्रेक लावला. राज्याचे चार लाख ४९ हजार क्विटंलचे उद्दिष्ट सोळा डिसेंबरपर्यंतच पूर्ण झाले. मका खरेदीला मर्यादित उद्दिष्ट दिल्याने जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक हजार ८२३ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली तर अचानक बंद झाल्याने विक्रीच्या प्रतीक्षेतील सात हजार ४१९ शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. 

दीड लाख क्विटंल खरेदीचा निर्णय

मागील पंचवीस दिवसांपासून सातत्याने शेतकरी केव्हा खरेदी सुरू होईल, याचा मागोवा घेत होते. सुरवातीला आठ दिवस अनेकांनी प्रतीक्षा केली. मात्र पूर्ववत खरेदी होण्याची चिन्हे नसल्याने अनेकांनी खासगी बाजारात १,१०० ते १,४०० रुपयांच्या दरम्यान मिळेल त्याभावाने मका विक्री केली आहे. शासनाचा हमीभाव १,८६० रुपये असताना क्विटंलमागे ४०० ते ६०० रुपयांची झळ करून शेतकऱ्यांनी मका विक्री केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला असून, आता निम्मे शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असताना ३१ तारखेपर्यंत अन् दीड लाख क्विटंल खरेदीचा निर्णय झाला आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

खरेदीसाठी मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्था आहेत. त्यांना शासनाकडून खरेदीला परवानगी देऊन पोर्टल सुरू होताच खरेदी सुरू होईल. - विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी 

हेही वाचा >  बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

अशी नोंदणी, अशी प्रतीक्षा... 
खरेदी केंद्र - ऑनलाइन नोंदणी शेतकरीसंख्या - खरेदी झालेले शेतकरी 

सिन्नर - १,१६४ - ३०८ 
येवला - १,४१२ - ३२८ 
लासलगाव - १,०८३ - २६८ 
चांदवड - १,०७६ - १८१ 
मालेगाव - १,२५१ - २६३ 
सटाणा - ८०९ - १३७ 
नामपूर - ३९९ - २३ 
देवळा - १,१३१ - १५९ 
नांदगाव - ९१७ - १५६ 
एकूण - ९,२४२ - १,८२३  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maize purchase portal is closed despite permission nashik marathi news