रब्बीतही मक्यावरच दुष्काळी तालुक्यांचा विश्‍वास; दीडपट क्षेत्र वाढले

maize.jpg
maize.jpg

येवला (नाशिक) : गहू, हरभरा आणि कांद्याचा हंगाम पिकविणाऱ्या जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बीतही मका भरवशाचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. खरिपात तर जिल्ह्यातील प्रमुख पीक बनलेल्या मक्याची रब्बीतही १६२ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. कमी उत्पादन खर्च, भरवशाचा बाजारभाव यामुळे मक्याला पसंती मिळत आहे. याशिवाय ज्वारी व हरभऱ्याच्या क्षेत्रात घट होताना गव्हाचे क्षेत्र मात्र यंदा वाढले आहे. 

सर्वधिक क्षेत्रावर गव्हाचे पीक 

मक्याला पोल्ट्री, स्टार्च उद्योगात मोठी मागणी वाढल्याने जिल्ह्यात कांद्यापेक्षाही अधिक क्षेत्र मक्याला गुंतविले जात आहे. एकट्या खरिपातच जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले गेले आहे. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीतील पीक पॅटर्न बदलणार हा अंदाज खरा ठरला असला, तरी अनपेक्षितपणे मात्र मक्‍याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र चार हजार ७७ हेक्टर असताना आतापर्यंत सहा हजार ६२४ हेक्‍टरवर म्हणजेच १६२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षी हेच क्षेत्र केवळ एक हजार १५० हेक्‍टर होते. त्यामुळे दुपटीने क्षेत्रवाढ झाल्याचे दिसते. शासकीय हमी भावाने खरेदी झाल्यास एक हजार ८६० रुपयांचा घसघशीत दर मक्याला मिळतो आणि नाही झाली तर खासगी बाजारातही १२०० ते १४०० रुपयांचा दर मिळत असल्याने हे पीक परवडत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळेच वर्षागणिक मक्याचे क्षेत्र वाढत आहे. 

पेरणीची टक्केवारी ९९.४३ टक्के इतकी

जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढले असले तरी सरासरीइतकी पेरणी झाली आहे. ज्वारीची मात्र अवघी ५० टक्के पेरणी झाल्याने निम्मे क्षेत्र घटले असून, हरभऱ्याचे क्षेत्रदेखील सरासरीपेक्षा कमी गुंतविले गेले आहे. हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज जास्तीच्या पावसाने चुकीचा ठरविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, पेरणीची टक्केवारी ९९.४३ टक्के इतकी आहे. सरतेशेवटी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. 

खरिपापाठोपाठ येथे मकाही... 

सर्वाधिक लागवड करून खरिपात भरमसाट उत्पादन घेतलेल्या मालेगाव, बागलाण, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांत मक्‍याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक दोन हजार हेक्टरवर सिन्नर तालुक्यात, तर त्याखालोखाल मालेगावला मक्याची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल सरासरीच्या दुपटीने मका येवल्यात घेतला गेला आहे. जिल्ह्यात रब्बीची सर्वाधिक पेरणी मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या दुष्काळी तालुक्यांतही झाली आहे, तर पश्‍चिमेकडील तालुक्यात मात्र रब्बीची पिके नसल्याने पेरणीचे आकडे अल्प दिसतात. 

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी (हेक्टर) 
पिके - सरासरी क्षेत्र - पेरणी क्षेत्र - टक्केवारी 

ज्वारी - ६,३२२ - ३,२३० - ५१.०९ 
गहू - ६२,४२५ - ६३,४४२ - १०१ 
मका - ४,०७७ - ६,६२४ - १६२ 
हरभरा -३८,१९७ -३४,४९० - ९० 
एकूण पेरणी - १,१२,७७९ – १,१२,१३४ - ९९.४३ 

तालुकानिहाय झालेली पेरणी (हेक्टर) 
तालुका – सरासरी – पेरणी - टक्केवारी 

मालेगाव - ८,०७० – ११,७२२ - १४५.२४ 
बागलाण - ११,७२५ – १२,८४५ - १०९.५५ 
कळवण - ७,९९३ – ७,४१३ - ९२.७४ 
देवळा - २,४१३ – १,७६५ - ७३.१३ 
नांदगाव - ५,१४३ – ९,२४५ - १७९.७४ 
सुरगाणा - २,८०३ – ३,१०६ - ११०.८१ 
नाशिक - ३,६८० – ३,११५ - ८४.६५ 
त्र्यंबकेश्‍वर - २,०९७ – ७५९ - ३६.२२ 
दिंडोरी - १०,८८६ – ११,५८३ - १०६ 
ईगतपुरी – ३,१६९ – २,२६५ - ७१.४८ 
पेठ - १,७०५ – १,९७४ - ११५.७८ 
निफाड - १७,८९१ – १३,०२० - ७२.७७ 
सिन्नर - १७,१०९ – १७,७३५ - १०३.६६ 
येवला - १०,९६८ – १०,७८५ - ९८.३३ 
चांदवड - ७,१२० – ४,७९९ - ६७.४ 
एकूण - १,१२,७७९ – १,१२,१३४ - ९९.४३  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com