हमीभावात मका खरेदीचा फुगा फुटला! जिल्ह्यात फक्त ३११ शेतकऱ्यांकडून खरेदी

विजय काळे 
Monday, 30 November 2020

खरेदी कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत असल्याने राहिलेल्या एक महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांची खरेदी होणार नसल्याने शासनाच्या या हमीभाव खरेदीचा फुगा यामुळे फुटला असून ही खरेदी म्हणजे ‘गजर गाड्याचा आणि निवड शेंगोळ्याचा’ असा संतप्त सूर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. 

रेडगांव खुर्द (नाशिक) : या खरीप हंगामातील मकाची शासकीय हमीभावाने नोंदणी आणि खरेदी राज्यात २ नोव्हेंबरपासून सुरू झाली मात्र नाशिक जिल्ह्यात महिनाभरात फक्त पोर्टलवरील नोंदीनुसार ३११ शेतकऱ्यांचा मका खरेदी केला तर बारदान नसल्याने आठवडाभरापासून जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद आहेत.

खरेदी कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत असल्याने राहिलेल्या एक महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांची खरेदी होणार नसल्याने शासनाच्या या हमीभाव खरेदीचा फुगा यामुळे फुटला असून ही खरेदी म्हणजे ‘गजर गाड्याचा आणि निवड शेंगोळ्याचा’ असा संतप्त सूर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. 

हा हमीभाव नेमका कोणासाठी?

दोन नोव्हेंबर रोजी मकाचे ऑनलाईन नोंदणी आणि खरेदी सुरु झाली. आज अखेर पोर्टलवर सात हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून नोंदणीची प्रक्रिया अजून चालू असल्याने हा आकडा दहा हजारांच्या पुढे जाईल. मात्र नोव्हेंबरमध्ये फक्त तीनशे अकरा शेतकऱ्यांची १२ हजार ५६९ क्विंटल एवढेच मका खरेदी झाल्यामुळे डिसेंबरमध्ये उर्वरित सर्व शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होणार नसून ही खरेदी म्हणजे हत्तीच्या शेपुट खरेदी होईल, मात्र हत्ती तसाच राहील, अशी अवस्था होणार असल्याने शेतकऱ्यांना या हमी भावाचा कोणताही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांच्या नावाने फक्त मोठमोठ्या वल्गना केल्या जातात मात्र कृतीत काहीच केले जात नाही हेच विदारक सत्य वर्षानुवर्ष शेतकरी बघत आले आहेत. ऑनलाइन नोंदणी झाली मोबाईलवर मेसेज आला म्हणून शेतकऱ्यांनी महिनाभरापासून मका शेतामध्ये उघड्यावर काढून ठेवल्या मात्र त्यांना खरेदी केंद्रावरच बोलविले जात नाही. त्यामुळे हा हमीभाव नेमका कोणासाठी? हेच कळत नसल्याचे शेतकरी सांगतात. 

शासनाने मका तात्काळ उचलावा 

मकाची हमीभाव खरेदी सुरू झाली की कधी बारदान नाही, कधी गोडाऊनस नाही, कधी हमाल नाही अशा विविध अडचणी संबंधित यंत्रणांकडून सांगितल्या जातात. यासाठी खरेदी केंद्रांवर खरेदी केलेला मका शासनाने तात्काळ उचलल्यास गोडाऊनची अडचण येणार नाही, असा सुर सर्वच खरेदी केंद्रांचा आहे. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

कोरोनामुळे पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही मात्र खरेदीचे आदेश दिले आहेत. 
विवेक इंगळे -जिल्हा मार्केटिंग अधिकारी 

सर्व शेतकऱ्यांची मका हमीभावाने खरेदी झाली पाहिजे तसेच खरेदीच्या वेळी सर्व संबंधित यंत्रणांना सर्व सूचित केले असतानाही हा दुर्लक्षित पण गंभीर आहे, याची माहिती घेऊन पत्रव्यवहार केला जाईल. 
- खासदार डॉ. भारती पवार 

खरेदीसाठी मोबाईलवर मेसेज येऊन महिना झाला मात्र खरेदीसाठी बारदान नसल्याचे उत्तर दिले जाते मग खरेदीसाठी बोलविणार तरी कधी? 
मोतीराम गांगुर्डे, शेतकरी 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

खरेदीकेंद्र शेतकरी संख्या क्विंटल 
सिन्नर ७९ २२८१ 
येवला ७० ३९९३ 
लासलगाव ० ० 
चांदवड २७ १०४४ 
मालेगांव ० ० 
सटाणा ४३ १६६६ 
नामपुर ० ० 
देवळा ७२ २७२६ 
नांदगाव २० ८४७ 
एकुण ३११ शेतकरी १२५६९ क्विंल खरेदी 

ऑनलाईन नोंदणी झालेले शेतकरी ६४१५ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maize was procured from only 311 farmers in the district nashik marathi news