'अन्यथा विद्यापीठासमोर तीव्र आंदोलनच!' राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

रोशन खैरनार
Monday, 19 October 2020

वेळोवेळी परीक्षेचे संकेतस्थळही बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागते. यांसह विविध अडचणींमुळे भेडसावत असल्याने विद्यार्थी त्रस्त असून मानसिक दडपणाखाली आहेत. त्यावर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. 

नाशिक : (सटाणा) कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या राज्यातील महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षेत विद्यापीठांच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या ऑनलाईन परीक्षांमध्ये तत्काळ सुधारणा करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे सोमवार (ता. 19) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

विद्यार्थी त्रस्त असून मानसिक दडपणाखालीच...

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित आहीरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसिलदार जितेंद्र इंगळे यांना दिलेल्या निवेदनात, महाविद्यालयांच्या ऑनलाईन परीक्षेत अनेक त्रुटी असून विद्यार्थ्यांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे. परीक्षांमध्ये मॉक टेस्ट व कुशल मनुष्यबळाचा अभाव असून अपात्रताधारक सर्व्हिस प्रोव्हायडर, हेल्पलाइन केंद्राची अकार्यक्षमता, प्रशासकीय दिरंगाई यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. डिव्हाईस व कनेक्टीव्हिटीचा अभाव आणि त्यानंतर ऑनलाईन पेपरचे लोगींग होत नाही. लोगींग झालेच तर पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमीट होत नाही. वेळोवेळी परीक्षेचे संकेतस्थळही बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागते. यांसह विविध अडचणींमुळे भेडसावत असल्याने विद्यार्थी त्रस्त असून मानसिक दडपणाखाली आहेत. त्यावर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

विद्यापीठाच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत. यापुढे ऑनलाईन परीक्षांमध्ये तत्काळ सुधारणा झाली नाही तर विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रोहित आहीरे, सुमित वाघ, सुजीत बिरारी, राजेंद्र सावकार, शोएब शेख, सागर वाघ, बबलू खैरणार आदींसह कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make immediate improvements to college online exams nashik marathi news