विक्रमी धान खरेदीसाठी योग्य नियोजन करावे : छगन भुजबळ 

महेंद्र महाजन
Friday, 9 October 2020

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते म्हणाले, की विक्रमी धान उत्पादन अपेक्षित असल्याने सद्यस्थितीत कार्यरत धान खरेदी केंद्रावर ताण येणार आहे.

नाशिक : खरीप व रब्बीच्या २०२०-२१ मधील हंगामात विक्रमी धान खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे धान खरेदी संबंधित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पणन मंडळ व आदिवासी विकास महामंडळाने सर्व बाबींचे योग्य नियोजन करावे अशी सूचना अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते म्हणाले, की विक्रमी धान उत्पादन अपेक्षित असल्याने सद्यस्थितीत कार्यरत धान खरेदी केंद्रावर ताण येणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत, अशा ठिकाणी धान खरेदी केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात यावी. पणन मंडळ व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रे वाढवावीत. धान उत्पादन अधिक होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेबाबतही नियोजन करावे. तसेच या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्राणालीचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे. खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, मनोहर चंद्रीकापुरे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाचे सचिव विलास पाटील, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक राठोड आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make the right planning for a record grain purchase says bhujbal nashik