मालेगावच्या मच्छी बाजार भागात लागली आग; किराणा दुकान भस्मसात तर खाननगर झोपडपट्टी वाचली

प्रमोद सावंत
Tuesday, 20 October 2020

शहरातील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या व मोठी बाजारपेठ असलेल्या मच्छी बाजार भागातील रियाज शेख इस्माईल यांच्या मालकीच्या रियाज किराणा या दुकानाला साडेसहाच्या सुमारास मोठी आग लागली.

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या व मोठी बाजारपेठ असलेल्या मच्छी बाजार भागातील रियाज शेख इस्माईल यांच्या मालकीच्या रियाज किराणा या दुकानाला सोमवारी (ता. १९) सकाळी साडेसहाच्या सुमारास मोठी आग लागली.

तीन बंब तातडीने घटनास्थळी पोचले

आगीत दांडापटाईचे असलेले दुकान व दुसऱ्या मजल्यावरील फळ्यांचे घर जळून खाक झाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. 
जुन्या महामार्गाने जाणाऱ्या नागरिकांनी अवघ्या दहा मिनिटांत महापालिका अग्निशमन दलाला या आगीची माहिती कळवली. महापालिका मुख्य अग्निशमन दलाचे दोन व आझादनगर भागातील ख्वाजा गरीबनवाज केंद्राचा एक, असे तीन बंब तातडीने पावणेसातच्या सुमारास घटनास्थळी पोचले. तीनही अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

बादशाह खाननगर झोपडपट्टी वाचली

लाकडी फळ्या व पट्ट्यांचे घर, दुकान असल्याने ते मात्र जळून खाक झाले. किराणा दुकानातील साहित्यही जळाल्याने दोन लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या भागातील बहुसंख्य घरे दांडापटाई, पत्रा, लाकडी फळ्या आदींचे आहे. नजीकच बादशाह खाननगर झोपडपट्टीही होती. आग तातडीने विझविल्याने शेजारील रहिवासी अथवा झोपड्यांना त्याची झळ बसली नाही, असे अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी सांगितले. अग्निशमन दल व शहर पोलिस ठाण्यात आगीची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात साठफुटी रस्त्यावरील निताज क्रिएशन्स या शोभेच्या वस्तू विक्री करणाऱ्या दुकान व गुदामाला आग लागल्याने ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समजते.  

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malegaon Fish market areas Grocery store fire nashik marathi news