मालेगावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे! रुग्णसंख्या कमी; दळणवळण वाढले

गोकुळ खैरनार
Tuesday, 27 October 2020

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लावावी लागली. कोरोनाच्या विळख्यात रुग्णसंख्या वाढतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्णसंख्या घटण्यासह मृत्यूचे प्रमाणही एकदम खाली आले.

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भाग चार महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त आहे. या भागात एकही रुग्ण नाही, तर शहराच्या कॅम्प-संगमेश्‍वर या पश्‍चिम भागात कोरोनाने विळखा घातला होता. महिन्यापूर्वी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या घरात होती. रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच या भागातील दळणवळण वाढले आहे.

कोरोनामुक्तीच्या दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल

सध्या शहरात केवळ १३५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. चारशेच्या घरात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असलेल्या ग्रामीण भागात सध्या १५३ रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे मालेगावने कोरोनामुक्तीच्या दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात फक्त मालेगावात रुग्ण आढळले होते. एप्रिल-मेमध्ये शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले. यातील काही रुग्ण दगावले होते.

पहिल्या टप्प्यात मालेगाव राज्यात चर्चेला

परिणामी पहिल्या टप्प्यात मालेगाव राज्यात चर्चेला आले. पूर्व भागातील कोरोना जुलैअखेर हद्दपार झाला. कोरोनाने जुलैपासूनच आपला मोर्चा कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, सटाणा नाका, कलेक्टरपट्टा या पश्‍चिम भागाकडे वळविला. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लावावी लागली. कोरोनाच्या विळख्यात रुग्णसंख्या वाढतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्णसंख्या घटण्यासह मृत्यूचे प्रमाणही एकदम खाली आले. 

अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर
तालुक्याच्या ग्रामीण भागातही रुग्णसंख्या कमी होत आहे. दाभाडी, झोडगे, रावळगाव, वडनेर, खाकुर्डी, अजंग, वडेल या मोठ्या गावांना कोरोनाने विळखा घातला होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने आठवडे बाजार सुरू झाले आहेत. शहर व तालुक्यातील दळणवळण वाढले असून, सणासुदीच्या दिवसात अर्थचक्र हळूहळू का होईना पूर्वपदावर येत आहे. नागरिकांमध्ये कोरोनासंदर्भातील भीती कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून ७० टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

मालेगाव कोरोना स्थिती 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ४०९५ 
पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- ३७९५ 
एकूण मृत्यू- १६५ 
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- १३५ 
एकूण निगेटिव्ह- २० हजार ७१ 
प्रगतीपर अहवाल- ५७ 
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी- ९२.६७ 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार

लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात संपर्क साधा

आरोग्यासह विविध घटकांच्या प्रयत्नामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. नागरिकांनी बेफिकीर राहू नये. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये. आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. - डॉ. शैलेशकुमार निकम तालुका आरोग्याधिकारी, मालेगाव  

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon journey towards Corona virus free nashik marathi news