क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात मालेगाव महापालिका राज्यात प्रथम 

प्रमोद सावंत
Wednesday, 21 October 2020

राज्यातील जानेवारी ते सप्टेंबर या कामगिरीचा आयुक्त, आरोग्यसेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांनी आढावा घेतला.

नाशिक/मालेगाव : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागाने जानेवारी ते सप्टेंबर २०२० या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या मूल्यमापनात राज्यात महापालिकास्तरावर मालेगाव येथील काम उल्लेखनीय झाल्याने महापालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. सर्व जिल्हा मिळून एकत्रित मानांकनानुसार मालेगाव महापालिका राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

राज्यातील जानेवारी ते सप्टेंबर या कामगिरीचा आयुक्त, आरोग्यसेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र यांनी आढावा घेतला. त्यात महापालिकेचे कामकाजाचे मूल्यमापन मार्गदर्शक सूचनांनुसार सरस दिसून आले. महापालिकेची कामगिरी उल्लेखनीय व्हावी, यासाठी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमोल दुसाने व क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कामगिरीत सातत्य व आलेख उंचावत ठेवला. यासाठी आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. डॉ. ठाकरे यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका होती. आगामी काळात शहरातून क्षयरोग हद्दपारचा मानस विभागाने ठेवला आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

शहरातून क्षयरोग हद्दपार होण्यासाठी १५ दिवसांपेक्षा जास्तीचा ताप किंवा खोकला किंवा दोन्ही, वजनात लक्षणीय घट, रात्री घाम येणे आदी लक्षणे असलेल्यांनी तातडीने जवळच्या सरकारी किंवा मनपा संचलित आरोग्य केंद्रात जाऊन आपली थुंकी/बेडका तपासणी करून घ्यावी. क्षयरोग हद्दपारीसाठी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना क्षयरुग्णांची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती न देणाऱ्या खासगी आरोग्य संस्थांवर कारवाई होऊ शकते, असे आरोग्य अधिकारी डॉ. ठाकरे यांनी सांगितले. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Municipal Corporation first in the state in tuberculosis eradication program nashik marathi news