मालेगावचे पाणी शुद्धच, अफवांवर विश्‍वास ठेवू नका - आयुक्त त्र्यंबक कासार

प्रमोद सावंत
Friday, 23 October 2020

गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथे पाणी येते. धरण परिसरात १६ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास मासे मृत आढळले. यानंतर तातडीने गिरणा पंपिंग स्टेशनवरील पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला होता.

नाशिक/मालेगाव : महापालिकेतर्फे शहरातील सर्व भागांत शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांनी निश्‍चिंत राहावे. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी केले.

महापालिका हद्दीत चणकापूर व गिरणा या दोन धरणांतून पाणीपुरवठा होतो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथे पाणी येते. धरण परिसरात १६ ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास मासे मृत आढळले. यानंतर तातडीने गिरणा पंपिंग स्टेशनवरील पाणीपुरवठा तात्पुरता बंद केला. शहरातील गिरणा पंपिंग स्टेशन (विनाप्रक्रिया केलेले पाणी) तसेच जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले. याशिवाय सर्व जलस्रोतांचे नमुने तपासणीसाठी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नाशिक येथे पाठविले. शुक्रवारी (ता. २३) हा अहवाल प्राप्त झाला. पाणी नमुने तपासणी अहवालामध्ये रॉ वॉटर फिल्टर (जलशुद्धीकरण) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाणी पिण्यास योग्य आहे, असे नमूद केले आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरास पिण्यासाठी पुरवठा होणारे पाणी पूर्णत: शुद्ध असल्याने नागरिकांनी निश्चिंत राहावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कासार यांनी केले आहे.

 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon water is pure, don't believe rumors says trimbak kasar nashik marathi news