पाणीटंचाईने त्रस्त मनमाडकरांना पावसाचा दिलासा; अखेर वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो

अमोल खरे
Sunday, 13 September 2020

पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला दिलासा मिळाला आहे.

नाशिक/मनमाड : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने सर्व धरणे भरत आली असताना सतत पाणीटंचाईने बेजार मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण यंदाही भरते की नाही, अशा परिस्थितीत मनमाडवासीय असताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने मनमाडकरांची प्रतीक्षा संपविली आणि वाघदर्डी धरण ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे. चार वर्षांनंतर वाघदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सहा महिने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही

पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मनमाड शहराला दिलासा मिळाला आहे. २०१६ मध्ये धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१६ मध्ये तब्बल दहा वर्षांनी धरण भरले होते. वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस पडत असल्याने धरण लवकर भरत नाही. यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. पालिकेने नियोजन करून पालखेड डाव्या कालव्याचे पूरपाणी पूर्ण क्षमतेने उचलले, तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या १५ दिवसांपासून समाधानकारक पाऊस बरसत असल्याने वाघदर्डी धरण शंभर टक्के भरले आणि धरणाच्या सांडव्यावरून पाणी खळखळून वाहू लागले. ऐन पावसाळ्यात मनमाड शहराला १२ ते १८ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू होता. आता वाघदर्डी धरण भरल्याने किमान सहा महिने हे पाणी शहराला पुरेल व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही मिळणार असल्याने पुढील काळात मनमाड शहराला पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावणार नाही त्यामुळे नागरिकांत समाधान आहे. पालिकेने किमान दहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 
 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

जलवाहिनी योजनेची गरज 
सध्या शहराची लोकसंख्या सव्वा लाख आहे. धरणाची क्षमता आणि कमी पर्जन्यमान यामुळे पाणीटंचाई निर्माण होत असल्याने शहराला शाश्वत पाणी मिळावे, यासाठी करंजवण जलवाहिनी योजना करणे गरजेचे आहे. 
 
सुरवातीला चांगला पाऊस झाला नसला तरी पालखेडचे आवर्तन घेतले होते. त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीचा चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याची धार सुरू झाली. त्यामुळे धरण भरले आहे. सहा महिने तरी पाणीटंचाई जाणवणार नाही. आता दिवस कमी करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करणार आहे 
-राजेंद्र आहिरे, प्रभारी नगराध्यक्ष 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

 संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manmad Waghdardi dam overflow nashik marathi news