Sakal Impact : 'त्या' दिव्यांग दांपत्याच्या मदतीसाठी सरसावले अनेक हात..! 

amit and seema mule physically disabled.jpg
amit and seema mule physically disabled.jpg

नाशिक : समाजातील अनेक लोक लॉकडाउनच्या काळात आर्थिकदृष्ट्या अडचणींमधून जात आहेत. दिव्यांगदेखील त्याला अपवाद राहिले नाहीत. दिव्यांगांची लॉकडाउनच्या काळात सुरू असलेल्या धडपडीबाबत ‘सकाळ’ने सोमवारी (ता. १३) ‘लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या दिव्यांग दांपत्याची जगण्यासाठी लढाई’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच त्या बातमीची दखल घेत काही दांपत्यांनी दिव्यांग दांपत्यास घरी जाऊन किराणा साहित्य व आर्थिक मदत केली. 

‘सकाळ’च्या बातमीने दिव्यांग दांपत्यास आर्थिक, वस्तू स्वरूपात मदत 
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे उत्पन्न मिळविण्याचे साधनच बंद झाले होते. तरीही अमित यांनी ऑनलाइन संस्कारवर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने हाती निराशा आली होती. पत्नी सीमा या दिव्यांग असूनदेखील टेलरिंगचे काम करतात. हिरावाडी परिसरात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने त्यांचेदेखील काम बंद आहे. मुळे दांपत्याना एक मुलगा व एक मुलगी आहेत. चार महिने त्यांनी घरात बसून काढले. मात्र आता त्यांना गरज होती ती आर्थिक मदतीची. ही बातमी प्रसिद्ध होताच सामाजिक संस्था व नागरिकांनी मुळे कुटुंबीयांच्या समस्यांना आर्थिक हातभार लावत मदत देऊ केली आहे. शहरातील अनेक संस्था व व्यक्ती मदतीसाठी पुढे आले आहेत.

अडचणी सोडविण्याचा प्रयत्न

सोशल नेटवर्किंग फोरम या नोंदणीकृत संस्थेकडून मुळे कुटुंबीयास पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत मुळे यांच्या बँकेच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आली. या वेळी प्रमोद गायकवाड, पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, जीवन सोनवणे, बत्तासे, रामदास शिंदे, विजय भडकमकर, डॉ. नीलेश त्रिपाठी यांनी मदत केली. अनेक दात्यांनी मुळे दांपत्याच्या मदतीसाठी व्यक्तिशः, तसेच संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत घरासाठी लागणारा किराणा, भाजीपाला, तसेच पैशांच्या स्वरूपात मदत करण्याचे कार्य सुरू केले आहे. सातपूर शासकीय आयटीआय (मुलांचे) येथील शिल्पनिर्देशक किशोर यांनी मुळे कुटुंबाला एक महिन्याचा संपूर्ण किराणा भरून दिला असून, भाजीपालादेखील घरी पोचवला आहे. 

‘सकाळ’ माध्यमातून समाजासमोर मांडूली परिस्थिती
सध्याच्या कोरोना संकटामुळे आमच्या कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजासमोर मांडून आम्हाला आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीस हजार रुपयांची आर्थिक मदत, तसेच किराणा स्वरूपात मदत मिळवून दिली आहे. - सीमा मुळे 


नागरिकांकडून अजूनही मदतीचा ओघ सुरू आहे. काही रोजगार मिळावा, यासाठी समाजातील काही लोकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. हे आपण दिलेल्या बातमीमुळे शक्य झाले आहे. ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाचे मनःपूर्वक आभार. -अमित मुळे 

रिपोर्टर - भाग्यश्री गुरव

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com