'इथे' होतोय दिवसआड अपघात अन्‌ मृत्यू.... 

sinner highway.jpg
sinner highway.jpg

नाशिक : शिर्डी, नगर आणि पुणे शहराला जोडणारे प्रमुख महामार्ग सिन्नर तालुक्‍यातून जातात. या रस्त्यांवरील वाहतूक आणि तिचा वेग सातत्याने वाढत आहे. वेगाच्या नादात 2018 आणि 2019 या दोन वर्षांत येथे जवळपास रोजच अपघात झाले आहेत. तालुक्‍यातील तिन्ही पोलिस ठाण्यांत या कालावधीत 393 अपघातांची नोंद झाली. त्यात 265 जणांचा मृत्यू, तर 362 जण जायबंदी झाले. अनेक प्रयत्न करूनही हे अपघात नियंत्रणात येत नसून त्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सिन्नरहून जाताय तर सावकाश जा, सुरक्षित हा संदेश देणे एव्हढेच काय ते प्रशासन व नागरिकांच्या हाती आहे. 

दोन वर्षांत 393 अपघात, 265 मृत्यूने महामार्ग बनला मृत्यूचा सापळा 

सिन्नर शहर व लगतच्या नाशिक-पुणे आणि सिन्नर-शिर्डी या प्रमुख रस्त्यांवर गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाहतूक वाढत आहे. विशेषतः मुंबईहून देवदर्शनासाठी शिर्डीला जाणारे अन्‌ पुण्याहून नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त नाशिकला येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. या प्रत्येकाला लवकर पोचण्याची घाई असते. त्यामुळे ते वेगाशी स्पर्धा करतात. त्यात रस्त्यातील विविध धोकादायक वळणे, खड्डे व नादुरुस्त वळणे यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत. तालुक्‍यातील तिन्ही पोलिस ठाण्यांत गेल्या वर्षात अपघातात अडीचशेहून अधिक मृत्युमुखी पडले. साडेतीनशेहून जादा लोक कायमचे जायबंदी झाले. गेल्या पंधरा वर्षांत या दोन्ही प्रमुख रस्त्यांवरच हे अपघात घडले आहेत. दिवसेंदिवस रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढतेच आहे. यात अनेकदा नवखे वाहनचालकही असतात. 

दिशादर्शक फलक न लावल्याने अनेक अपघात

या मार्गावरील वाहनांची प्रचंड संख्या पाहता रस्त्यांचे रुंदीकरणही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. गेल्या दोन वर्षांत सिन्नर शहराच्या बाहेरून गेलेल्या वळण (बायपास) रस्त्यावरही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधितांनी रस्त्यावर अथवा महामार्गावर योग्य ते दिशादर्शक फलक न लावल्याने अनेक अपघात घडताहेत. माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या फाट्यापासून सुरू होणारा बाह्य वळण रस्ता चारपदरी आहे. या रस्त्यावरून वाहने सुसाट धावतात. मात्र अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड जोडण्याच्या ठिकाणी योग्य फलक नाहीत. त्यातून अपघात झाले आहेत. अद्यापही शहराजवळ असलेल्या रस्त्यावर पथदीप नाहीत. नाशिक-पुणे हा शहरातून जाणारा महामार्ग तर किरकोळ अपघातांचा रस्ता बनला आहे.

दुभाजकावर अद्यापही पथदीप नाही..

बसस्थानकापासून या रस्त्यावरच्या दुभाजकावर अद्यापही पथदीप नसल्याने अनेक लहान-मोठी वाहने रात्रीच्या अंधारात दुभाजकावर धडकतात. बायपासवरच्या उड्डाणपुलाजवळील अंडरपास रस्त्यावरही अनेक अपघात होऊन माणसे मृत्युमुखी पडली आहेत. अद्यापही या ठिकाणी आवश्‍यक असणारे फलक लावले नाहीत. नाशिक-पुणे रोडवर पावसाळ्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले. रस्ता काही ठिकाणी उंच-सखल झाला. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांवरचा ताबा सुटून अपघात घडल्याचे चित्र आहे. 
सिन्नर-शिर्डी रस्ता हा तर जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावरील असणाऱ्या अनेक गावातील ग्रामस्थांनी रस्त्याबाबत प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष झाले. मुंबईचे वाहनचालक काहीसा अरुंद असलेल्या या रस्त्यावर बेदरकारपणे वाहने चालवतात. शिर्डी- मुंबई जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस लागोपाठ धावत असतात. त्यांच्यात जवळजवळ वेगाने जाण्याची शर्यतच लागलेली असते. अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे अपघात घडतात. ते नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे. 

हेही वाचा > "माझ्यासोबत गाडीवर चल" असे सांगून तिला घरी घेऊन गेला..अन्..
पदयात्रांनी होतेय कोंडी 
शिर्डी रोडवर मुंबई, गुजरात व स्थानिक साईभक्त शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी पदयात्रा काढतात. अधिच अरुंद असलेल्या या रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे काही अपघातांत अनेकदा साईभक्तही जखमी झाले आहेत. या निष्पाप जीवांचा बळी केवळ वाहतुकीचे नियम व रस्त्यांची देखरेख नसल्यामुळे होत आहे. 2018 ते 2019 या दोन वर्षांच्या काळात सिन्नर, एमआयडीसी आणि वावी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अधिकृतपणे दाखल झालेल्या अपघातांची संख्या 393, तर यात मृत पावलेल्यांची संख्या 265, तर कायमचे जायबंदी झालेल्यांची संख्या 362 इतकी आहे. 

हेही वाचा > PHOTO : कटला, सुरमई, पापलेट, वाम...अरे वाह! 'इथं' तर माशांची मेजवानीच!...पण, कोरोना? 
सिन्नरमधील दोन वर्षांतील अपघात 
अपघातांची संख्या - 393 
मृतांची संख्या- 265 
जखमींची संख्या- 362 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com