
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकला यजमानपदाची पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या आमंत्रणाविषयी निर्णय न झाल्याने अखेर लोकहितवादी मंडळातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला औरंगाबाद येथे जाऊन नाशिककरांनी पुन्हा निमंत्रण दिले.
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकला यजमानपदाची पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या आमंत्रणाविषयी निर्णय न झाल्याने अखेर लोकहितवादी मंडळातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला औरंगाबाद येथे जाऊन नाशिककरांनी पुन्हा निमंत्रण दिले. त्यानुसार येत्या ७ जानेवारी २०२१ ला शहरात स्थळपाहणीसाठी समिती येण्याबरोबरच महामंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याचे संकेत मिळताहेत.
मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकला पसंतीची शक्यता
सार्वजनिक वाचनालयातर्फे ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निमंत्रण देण्यात आले होते. पण, त्या वेळी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी २२ जुलै २०१९ ला हे संमेलन उस्मानाबादमध्ये घेण्याची घोषणा केली होती. तत्पूर्वी १५ जुलै २०१९ ला त्या संमेलनासाठी नाशिकमध्ये स्थळपाहणी करण्यात आली होती. आगामी संमेलनासाठी अमळनेर, दिल्ली आणि नाशिकचे निमंत्रण महामंडळाकडे पोचले आहे. दिल्लीसाठी घुमान (पंजाब) येथे संमेलन यशस्वी केलेल्या सरहद्द संस्थेने निमंत्रण दिले आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर महामंडळ नाशिककरांच्या निमंत्रणाचा विचार करेल, असा विश्वास साहित्य वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
७ जानेवारीला स्थळपाहणी; महामंडळाच्या बैठकीत निर्णयाची चिन्हे
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाबद्दलची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत पोचविण्यात आली आहे. शिवाय लोकहितवादी मंडळाशी माजी आमदार हेमंत टकले निगडित आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाचनालयाच्या बैठकीत संमेलनासाठी निमंत्रण देण्यासंबंधीचा निर्णय अंधूक दिसू लागताच, लोकहितवादी मंडळाने पुढाकार घेतला. स्वाभाविकपणे नाशिकच्या यजमानपदासाठी एक प्रकारचे वजन प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
गुणवत्तापूर्ण आयोजनाला महत्त्व
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रसिकांची गर्दी करण्याऐवजी संमेलनाचे आयोजन गुणवत्तापूर्ण होईल, यादृष्टीने नाशिकमधील साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. संमेलनाचा यजमानपदाचा मुद्दा येत्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असल्याने त्यादृष्टीने नाशिककरांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.