दिवाळीमुळे बाजारपेठांत गर्दी कायम; खरेदीसाठी मात्र दुकानांपेक्षा फेरीवाल्यांना पसंती

दत्ता जाधव
Tuesday, 10 November 2020

काही वर्षांपासून शालिमार परिसर शहराची मुख्य बाजारपेठ बनला आहे. या ठिकाणी हातगाडी लावून वस्तूंची विक्री केली जाते. त्यात लहान मुलांच्या कपड्यांसह जीन्स, टीशर्टससह घरगुती वापरांच्या व महिलांच्या वस्तू उपलब्ध आहेत.

नाशिक : आबालवृद्धांना आकर्षण असलेल्या दीपावलीच्या पहिल्या दिव्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असल्याने बाजारात खरेदीसाठी झुंबड उडालेली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांचे आर्थिक बजेट कोसळल्याने यंदा खरेदीसाठी दुकानांऐवजी फेरीवाल्यांकडे खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असल्याने मोठी दुकाने ओस, तर रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसत आहे. 

लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजाळून टाकणाऱ्या दिवाळीचे आकर्षण सर्वांनाच. त्यातच सातपूर, अंबड भागातील बहुतांश आस्थापनांनी बोनससह पगाराचे वाटप केल्याने नाशिककर सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे तीन-चार दिवसांपासून मेन रोड, शालिमार, रविवार पेठ, सराफ बाजार याठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही इतका खरेदीदारांचा उत्साह दिसून आला. उद्याही हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. 

शालिमार परिसर गजबजला 

काही वर्षांपासून शालिमार परिसर शहराची मुख्य बाजारपेठ बनला आहे. या ठिकाणी हातगाडी लावून वस्तूंची विक्री केली जाते. त्यात लहान मुलांच्या कपड्यांसह जीन्स, टीशर्टससह घरगुती वापरांच्या व महिलांच्या वस्तू उपलब्ध आहेत. याठिकाणी अनेक गृहोपयोगी वस्तू अतिशय स्वस्त दरांत उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. याशिवाय अनेक मोठ्या दुकानदारांनीही सेल लावला असून, तेथेही खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. 

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

कानडे मारूती लेन बनला शॉपिंग हब 

कधीकाळी शहरातील एक छोटी गल्ली अशी ओळख असलेल्या कानडे मारूती लेन आता शॉपिंग हब बनला आहे. याठिकाणी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य वस्तू होलसेल दरात उपलब्ध होत असल्याने सकाळपासूनच खरेदीसाठी मोठी झुंबड उडते. याशिवाय आकाशकंदील, रांगोळ्या, विद्युत माळा होलसेल भावात उपलब्ध आहेत. 

प्रवेशबंदीतही चारचाकी वाहने 

मेन रोड, शालिमार या शहराच्या मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी टिळक पथ सिंग्नल, नामको बँक या ठिकाणांहून शहरात चारचाकींना मज्जाव केला आहे. याही परिस्थितीत वर्दीची नजर चुकवून अनेक चारचाकी वाहने भद्रकाली, बोहरपट्टी, सोमवार पेठ आदी भागातून बाजारपेठेत शिरत असल्याने अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: markets are crowded due to Diwali nashik marathi news