शेताच्या बांधावर लोकप्रतिनिधींच्या भेटी; अवकाळी पावसात द्राक्ष, भाजीपाला, भात पिकांचे नुकसान 

राम खुर्दळ
Monday, 26 October 2020

भात पीक अक्षरश: चिखलात, पाण्यात भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतावर आता नेत्या, अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले असून, तातडीने शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

गिरणारे (जि.नाशिक) : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील गिरणारे, दुगाव, धोंडेगाव, देवरगाव, साप्ते, वाघेरासह हरसूल, गणेशगाव, वेलुंगे, माळेगाव, रोहिले भागात अवकाळी पावसाने भात, नागली, पावसाळी भाजीपल्यांसह तूर, मूग, उडीद डाळींचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक अक्षरश: चिखलात, पाण्यात भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतावर आता नेत्या, अधिकाऱ्यांचे दौरे सुरू झाले असून, तातडीने शेतकऱ्यांच्या हाती मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बांधावर लोकप्रतिनिधींच्या भेटी 
परतीच्या पावसाने शेतांना तलावाचे स्वरूप आले. खरिपाची ऐन काढणीत आलेले पीक, फळबागा, भाजीपाला धोक्यात आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील पीक नुकसानीबद्दल पंचनामा करण्यासाठी आमदार सरोज आहिरे व आमदार हिरामण खोसकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून तातडीने खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे सूचित केले आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील तहसीलदारांनी तलाठ्यांना सूचना करून पीक नुकसानीबद्दल पंचनामे, अहवाल मिळावे, याबाबत सूचना केल्या आहेत. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

नुकसानग्रस्तांकडून पंचनाम्याची मागणी;
माझ्या पाच एकरांतील भातात आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी तुंबले आहे. भाताचे पीक कापून ठेवले अन् पावासाने कहर केला. अख्खे सोंगलेल्या भाताच्या पेंढ्या पाण्यात भिजल्या आहेत. दर वर्षी मला २०० पोते भात होतो. मात्र, यंदा पावसाळी नुकसानीत पोतंभरही भात होणार नाही, अशी स्थिती आहे. मी पुरता उद्‌ध्वस्थ झालो आहे. -मधू बुधा दिवे, नुकसानग्रस्त शेतकरी, माळेगाव (ता. त्र्यंबकेश्वर)  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meetings of the politicians on the farm nashik marathi news