नाशिकमध्ये मेक्सिकन कंपनीची ७०० कोटी गुंतवणुकीची तयारी; 'या' परिसरात जागेचा शोध सुरु

विक्रांत मते
Monday, 14 September 2020

मेक्सिको मध्ये ईन्शुरन्स क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीने नाशिक मध्ये रुग्णालय उभारण्याची तयारी सुरु केली आहे. कोरोनाचा शिरकाव होण्यापुर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात कंपनीने नाशिक मधील मोठ्या कार्पोरेट हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांची तांत्रिक बाबी पुर्ण करण्यासाठी नियुक्ती केली. मार्च महिन्यात प्रकल्पाला मुर्त स्वरुप देण्यासाठी कामकाजाला सुरुवात झाली परंतू कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामाला ब्रेक लागला.

नाशिक :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेक्सिकन कंपनीने नाशिकमध्ये सातशे कोटी रुपये गुंतवणुकीची तयारी सुरु केली असून त्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. शंभर एकर जागेत प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा मानस असून परदेशातील रुग्णांवर विशेषतः येथे उपचार केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या माध्यमातून नाशिक मध्ये रोजगाराला देखील मोठी संधी उपलब्ध होणार आहे. नाशिक मधील काही तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न आहे. 

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामाला ब्रेक

मेक्सिको मध्ये ईन्शुरन्स क्षेत्रात नावाजलेल्या कंपनीने नाशिक मध्ये रुग्णालय उभारण्याची तयारी सुरु केली आहे. कोरोनाचा शिरकाव होण्यापुर्वी म्हणजे जानेवारी महिन्यात कंपनीने नाशिक मधील मोठ्या कार्पोरेट हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांची तांत्रिक बाबी पुर्ण करण्यासाठी नियुक्ती केली. मार्च महिन्यात प्रकल्पाला मुर्त स्वरुप देण्यासाठी कामकाजाला सुरुवात झाली परंतू कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामाला ब्रेक लागला. परंतू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पुन्हा या कामाला गती देण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी सरसावले आहेत. निमित्त कोरोनाचे असले तरी त्यापुर्वीपासूनचं रुग्णालय उभारण्याचे निश्चित झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाला अधिक गती दिली जात आहे. ईगतपुरी ते घोटी दरम्यान निसर्ग सौंदर्य व मुंबई पासून जवळचे अंतर लक्षात घेता याच जागे मध्ये प्रकल्प उभारण्याला प्राधान्य दिले जात आहे. निसर्ग सौंदर्याबरोबरचं पाण्याची उपलब्धता व महामार्गाचा विस्तार हे देखील प्रकल्पाचे स्थान निश्चित करण्यामागचे कारण आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

विमानतळ, महामार्गाची उपलब्धता 

मेक्सिको किंवा ईन्शुरन्स कंपनी मार्फत नोंदणी झालेल्या रुग्णांना प्रस्तावित रुग्णालयात उपचार दिले जाणार आहे. विशेष करून परदेशातून रुग्ण उपचारासाठी येणार असल्याने मुंबई व नव्याने तयार होत असलेल्या नवी मुंबई विमानतळावरून अॅम्बुलन्स किंवा एअर अॅम्ब्युलन्स च्या माध्यमातून रुग्णांना येथे आणले जाणार आहे. रुग्णालयात नर्सेस पासून ते तज्ञ डॉक्टरांपर्यंचा स्टाफ कंपनीकडून नियुक्त केला जाणार आहे. 

समृध्दी महामार्गाचा होणार लाभ 

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात घोटी व सिन्नर येथे महामार्गावर चढ-उताराची सोय तर सध्या अस्तित्वात असलेल्या सहा पदरी महामार्गामुळे देखील घोटी परिसरात रुग्णालय उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय वाहतुक मंत्रालयाने गोंदे पासून रिंगरोड तयार करण्यास मंजुरी दिली आहे. वाघेरे, गिरणारे, म्हसरुळ, सय्यद पिंप्री, शिंदे, पळसे मार्गे वाडीवहे, गोंदे असा रिंगरोड प्रस्तावित आहे. त्यामुळे रिंगरोडच्या माध्यमातून रुग्णांची ने-आण करणे सोपे असल्याने या पायाभुत सुविधेच्या दृष्टीनेही रुग्णालय उभारताना विचार झाला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

 
गोंदे ते घोटी दरम्यान काही महिन्यांपुर्वी एका कंपनीकडून जागेबाबत विचारणा झाली होती. परंतू मेडीकल संदर्भात होती कि अन्य विषयासंदर्भात हे सांगता येणार नाही. मात्र मोठ्या कंपनीकडून घोटी येथे जागेचा शोध सुरु आहे.- नितीन गवळी, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी. 

 

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mexican company ready to invest Rs 700 crore in Nashik marathi news