esakal | स्थलांतरित कष्टकऱ्यांची आस : घरी जाण्यासाठी राज्यासह केंद्राच्या निर्णयाकडे खिळल्या नजरा!
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown nsk 2.jpg

निवारा केंद्रांमधून असलेल्या स्थलांतरित कष्टकऱ्यांच्या व्यतिरिक्त गाव-शहरांमध्ये स्थलांतरित आहेत. त्यांच्यासाठी तालुका समित्यांची स्थापना झाली असून, अन्न पुरविले जाते. राज्याबाहेर घरी असलेल्या कष्टकऱ्यांना पाठविण्याचा निर्णय केंद्राकडून झालेला नाही. पण तोपर्यंत यंत्रणेने राज्यातील आणि बाहेरील राज्यातील कष्टकऱ्यांच्या संख्येची आकडेवारी तयार केली आहे. मात्र निवारा केंद्राव्यतिरिक्त गाव-शहरांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना राज्याबाहेर जायचे झाल्यास काय करायचे, असा प्रश्‍न यंत्रणांपुढे आहे.

स्थलांतरित कष्टकऱ्यांची आस : घरी जाण्यासाठी राज्यासह केंद्राच्या निर्णयाकडे खिळल्या नजरा!

sakal_logo
By
महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ऊसतोडणी कामगारांना घरी पाठविण्याचा निर्णय झाला असल्याने राज्यातील चार हजार 827 निवारा केंद्रांतील पाच लाख 40 हजारांहून अधिक स्थलांतरित कष्टकऱ्यांना आपल्या घरी जाण्याची आस लागली आहे. एकीकडे ही राज्यातील कष्टकऱ्यांची स्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या बाहेर घरी असलेल्यांना पाठविण्यासाठी केंद्र सरकारकडून कधी निर्णय येतो याकडे स्थलांतरितांच्या नजरा लागल्या आहेत. भावनेपेक्षा आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने यंत्रणेने त्याकडे लक्ष केंद्रित करत असतानाच कष्टकरी वैतागणार नाहीत याची काळजी घेण्यास सुरवात केलीय. 

भावनेपेक्षा आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची; दिवस कंठण्यातून तीन प्रकारचे मतप्रवाह 

मुंबईतील कंपनी सुरू होतेय, अशी माहिती पाठविल्याने पुन्हा कामावर जाण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधील स्थलांतरितांनी तयारी केली आहे. त्यासाठी घरी जायचे आणि परत येण्यापेक्षा नाशिकमधून थेट मुंबईला जाता येईल, असा एक कष्टकऱ्यांमध्ये मतप्रवाह आहे. त्याच वेळी बस्स झालं, आता थेट घरी जाऊ आणि शेती करू, अशा दुसऱ्या मतप्रवाहाचे कष्टकरी आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन संपल्यावर नंतर पाहू, असे म्हणणाऱ्या तिसऱ्या मतप्रवाहाचे काही कष्टकरी आहेत. निवारा केंद्रांमधून स्थलांतरित कष्टकऱ्यांना धीर देण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना हे मतप्रवाह ऐकायला मिळत आहेत. निवारा केंद्रात सुविधा, दोन वेळचे भोजन, नाश्‍ता, चहा, फळे अशी व्यवस्था असली, तरीही घरी असलेल्या कुटुंबीयांच्या आठवणींमुळे कष्टकरी वैतागत असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना येतो. अशातच, कुणाच्या मोबाईलचे रिचार्ज संपल्यावर अधिकारी रिचार्ज करून देतात. वेळप्रसंगी स्वतःच्या मोबाईलवरून संपर्क करून देतात. आता राज्यांतर्गत कामगारांना पाठवायचे झाल्यास प्रत्येकाच्या आरोग्य तपासणीचा अहवाल अद्ययावत करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भागनिहाय बसगाडीने निवारा केंद्रातून कष्टकऱ्यांना त्यांच्या घरी सोडावे लागणार आहे. त्यांच्याशी इतरांचा संपर्क येणार नाही, अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल. 

केंद्राव्यतिरिक्तचे स्थलांतरित 
निवारा केंद्रांमधून असलेल्या स्थलांतरित कष्टकऱ्यांच्या व्यतिरिक्त गाव-शहरांमध्ये स्थलांतरित आहेत. त्यांच्यासाठी तालुका समित्यांची स्थापना झाली असून, अन्न पुरविले जाते. राज्याबाहेर घरी असलेल्या कष्टकऱ्यांना पाठविण्याचा निर्णय केंद्राकडून झालेला नाही. पण तोपर्यंत यंत्रणेने राज्यातील आणि बाहेरील राज्यातील कष्टकऱ्यांच्या संख्येची आकडेवारी तयार केली आहे. मात्र निवारा केंद्राव्यतिरिक्त गाव-शहरांमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना राज्याबाहेर जायचे झाल्यास काय करायचे, असा प्रश्‍न यंत्रणांपुढे आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत गावांमधून अन्न पुरविण्यात येणाऱ्या राज्याबाहेरील स्थलांतरितांची संख्या संकलनाला सुरवात झाल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, निवारा केंद्रात असलेले कष्टकरी शहरी भागातील कंपन्या, बांधकाम व इतर कामांवर काम करणारे आहेत. ग्रामीण भागामधून रोजगार द्यायचा झाल्यास त्यातील किती जण "मनरेगा' कामासाठी तयार होतील, हा प्रश्‍न आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातील कारखाने, बांधकामे सुरू झाल्यावर आणि मागणी आल्यास इच्छुकांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्‍य होणार आहे. शिवाय रेल्वेने घरी पाठवायचे झाल्यास निवारा केंद्राव्यतिरिक्तच्या कष्टकऱ्यांचे काय करायचे, अशा साऱ्या विविध प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर निवारा केंद्रातील कष्टकऱ्यांप्रमाणे यंत्रणांचे राज्य आणि केंद्राच्या पुढील मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​
स्थलांतरित कष्टकऱ्यांची स्थिती 
विभागाचे नाव निवारा केंद्रसंख्या स्थलांतरित कष्टकरी संख्या साखर कारखाना केंद्रातील कष्टकरी 
कोकण 1 हजार 776 1 लाख 90 हजार 808 - 
नाशिक 198 10 हजार 642 - 
पुणे 1 हजार 137 2 लाख 22 हजार 948 1 लाख 1 हजार 257 
औरंगाबाद 497 38 हजार 880 340 
अमरावती 233 27 हजार 190 - 
नागपूर 986 45 हजार 515 4 हजार 867 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?