जिल्‍हास्‍तरावर भरविणार विभागाचे मंत्रालय - मंत्री उदय सामंत

अरुण मलाणी
Sunday, 20 September 2020

शैक्षणिक वर्ष लांबल्‍यामुळे शिक्षणक्रमात कपात करण्यासंदर्भातील निर्णय संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, ॲकॅडमिक कौन्‍सिलच्‍या माध्यमातून घेतले जाईल. हा संपूर्ण निर्णय विद्यापीठाच्‍या कुलगूरूंवर सुपूर्द केला आहे.

नाशिक :  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्‍यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रालय जिल्‍हास्‍तरावर एक दिवस कार्यान्‍वित केले जाईल. जिल्‍ह्‍यातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्‍थांसह विद्यार्थ्यांच्‍या अडीअडचणी या माध्यमातून सोडविण्यात येणार असल्‍याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता.२०) दिली.

सीईटी परीक्षा २० ऑक्‍टोबरपर्यंत पार पडणार

 विद्यापीठांच्‍या अंतीम वर्ष परीक्षेबाबतचा आढावा घेण्यासाठी श्री. सामंत नाशिक दौर्यावर आले होते. दरम्यान विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा येत्‍या १ ते २० ऑक्‍टोबर दरम्‍यान पार पडणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.याप्रसंगी जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्‍त दीपक पांडे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डी. पी. नाठे आदी यावेळी उपस्‍थित होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

आरक्षणाबाबत लवकरच विकल्‍प

कोरोनामुळे अभ्यासक्रमातील भाग वगळण्यासंदर्भातील प्रश्‍नावर सामंत म्‍हणाले, की शैक्षणिक वर्ष लांबल्‍यामुळे शिक्षणक्रमात कपात करण्यासंदर्भातील निर्णय संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, ॲकॅडमिक कौन्‍सिलच्‍या माध्यमातून घेतले जाईल. हा संपूर्ण निर्णय विद्यापीठाच्‍या कुलगूरूंवर सुपूर्द केला आहे. मराठा आरक्षण टिकले पाहिजे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भुमिका आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रवेशासाठी आरक्षणाबाबत येत्‍या तीन-चार दिवसात विकल्‍प उपलब्‍ध करून दिला जाईल. सध्याची परीस्‍थिती लक्षात घेता, कुठल्‍याही अभ्यासक्रमाचे शुल्‍क वाढवू नये. तसेच अन्‍य विविध स्‍वरूपाचे शुल्‍कांमध्ये लॉकडाउनच्‍या मुदतीबाबत सुट द्यावी. शुल्‍क भरण्यासाठी विद्यापीठानी किमान चार हप्त्यांचा पर्याय उपलब्‍ध करून देण्यास सांगितले आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ministry will be functioning at the district level for one day nashik marathi news