"अवघी चार कोटी रुपयांची भरपाई म्हणजे जखमेवर मीठ" - आमदार बोरसे

अंबादास देवरे 
Monday, 30 November 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात, तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः कूचेष्टा केली आहे. असे मत आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले आहे. 

सटाणा (नाशिक) : गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत बागलाण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे शंभर कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाने अवघी चार कोटी रुपयांची भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्य सरकारने खरिपाबरोबरच कांदा रोप, द्राक्ष, डाळिंब पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात, तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः कूचेष्टा केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकाबरोबरच हजारो रुपये खर्च करून कांदा बियाणे टाकले; मात्र अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे रोपे खराब होऊन आर्थिक फटका बसला. द्राक्ष, डाळिंब पिकांचे सलग दुसऱ्या वर्षी अतिपावसामुळे पन्नास कोटींहून अधिक नुकसान झाले. असे असताना राज्य सरकारने फक्त चार कोटी रुपये इतकी तुटपुंजी भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. वास्तविक गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन ६३ कोटी रुपयांची तत्काळ भरपाई दिली होती. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना यंत्रणेला पंचनामे करण्यावर मर्यादा आणल्यामुळेच ९० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

लाखो रुपये खर्च करूनही अतिवृष्टीमुळे द्राक्षांची घड जिरून उत्पादन थेट २० ते २५ टक्क्यांवर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. डाळिंब पिकाची देखील तीच अवस्था असून, काढणीवर आलेले पीक बुरशीच्या प्रादुर्भावमुळे रात्रीतून गळून पडले. खरिपाची तर नासाडी झालीच, परंतु घरात थोडीफार जमा असलेली रक्कम मोडून कांदा बियाणे घेतले; मात्र तेही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारने याचा विचार करून सरसकट भरपाई द्यावी. जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी केली आहे.  

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Borse demand for substantial funding for crop damage nashik marathi news