सत्ताधारी भाजपला स्मृतिभ्रंशाची बाधा; रस्त्यांवरील खड्डयांवरून मनसेचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

एका महिन्यात रस्त्यांवर नऊ हजार ४६२ खड्डे बुजविल्याचा दावा भाजपने केल्याने त्यावरून रस्त्यांच्या कामात भ्रष्ट्राचार झाल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप मनसेने केला. रस्त्यांबाबत भाजपने खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करू नये; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र जनआंदोलन उभारून दोषी अधिकारी व कंत्राटदारांना जाब विचारण्याचा इशारा देण्यात आला. 

नाशिक : काही वर्षांपूर्वीच बनविलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर ते खड्डे आमच्या सत्ताकाळात नव्हते, असा पवित्रा घेत अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शनिवारी (ता. १८) मनसेतर्फे जसेच्या तसे उत्तर देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी चुकीच्या कारभाराचे खापर मनसेवर फोडून भाजपने हसू करून घेतल्याचे सांगत मनसेच्या सत्ताकाळात भाजपदेखील सत्तेत सहभागी होत असल्याची आठवण करून दिली. 

रस्त्यांवरील खड्डयांवरून मनसेचा पलटवार 

मुसळधारेमुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. दोन्ही पक्षांच्या आक्रमकतेला भाजपकडून सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी प्रत्युत्तर देताना भाजपच्या सत्ताकाळात झालेले रस्ते सुस्थितीत असून, शिवसेना व राष्ट्रवादीकडून ज्या रस्त्यांबाबत आरोप करण्यात आले, ते मनसेच्या सत्ताकाळात झाल्याचा दावा केला होता. त्याला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले. मनसेच्या सत्ताकाळात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच रस्ते झाले आहेत. एका महिन्यात रस्त्यांवर नऊ हजार ४६२ खड्डे बुजविल्याचा दावा भाजपने केल्याने त्यावरून रस्त्यांच्या कामात भ्रष्ट्राचार झाल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप मनसेने केला. रस्त्यांबाबत भाजपने खोटे दावे करून जनतेची दिशाभूल करू नये; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र जनआंदोलन उभारून दोषी अधिकारी व कंत्राटदारांना जाब विचारण्याचा इशारा देण्यात आला. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मनसेच्या सत्ताकाळात उपमहापौरपदासह अन्य पदे उपभोगणाऱ्या भाजपला मनसेच्या काळात झालेल्या विकासाचे प्रकल्प स्मार्टसिटीत दाखविण्यासाठी चालतात. मात्र सर्वत्र रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ओरड होत असताना ते रस्ते आमचे नव्हेत, असा विश्वामित्री पवित्रा घेणे योग्य नाही. - अनंता सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, मनसे  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS retaliates against ruling BJP over potholes nashik marathi news