आधुनिकतेसाठी वस्त्र उत्पादकांनी इतर क्षेत्रांकडे वळावे - स्मृती इराणी

संतोष विंचू
रविवार, 2 ऑगस्ट 2020

विणकर बांधवांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी येथे या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, मास्टर विणकरांना किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या विणकरांना व कारखानदारांना कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त प्रमाणात वित्तपुरवठा करण्यात यावा या मागण्यादेखील बाळासाहेब कापसे आणि मनोज दिवटे यांनी मांडल्या. 

नाशिक : (येवला) देशातील वस्त्र उत्पादकांनी मेडिकल टेक्स्टाईल, ॲग्रो टेक्स्टाइल माध्यमातून आधुनिकतेची कास धरत या क्षेत्राकडे वळावे. कारण मेडिकल विभागाशी संबंधित असणाऱ्या मेडिकल टेक्स्टाइल तसेच ॲग्रो टेक्स्टाइलच्या माध्यमातून प्लॅस्टिकला पर्याय म्हणून व पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून या क्षेत्रात आर्थिक सुबत्तेसह रोजगाराची संधी असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी दिली. 

विविध भागांतून ४८ उत्पादकांचा सहभाग

केंद्रीय मंत्री इराणी यांनी राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उत्पादकांशी वेबिनारवर संवाद साधला. या वेळी त्यांनी वस्त्रोत्पादकांना या क्षेत्रातील संधीविषयी माहिती दिली. त्यांनी कोरोनाच्या संकटात वस्त्रोद्योग उत्पादकांना आलेल्या आणि येणाऱ्या समस्या जाणून घेत या महामारीच्या काळात सर्वांना कशी संधी उपलब्ध आहे, याबाबतही मार्गदर्शन केले. राज्यातील विविध भागांतून ४८ उत्पादक यात सहभागी झाले होते. कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे व भाजप वस्त्रोद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे यांनीदेखील वेबिनारमध्ये सहभागी होत पैठणी उद्योगाकांपुढे असलेल्या समस्या मांडत केंद्र सरकारने पैठणी विणकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

तसेच विणकरांना वस्त्र मंत्रालय व सूक्ष्म लघु-मध्यम विभागाकडून प्रतिहातमाग एक लाख रुपये खेळते भागभांडवल किमान चार टक्के व्याज दराने उपलब्ध करून द्यावे, सर्वच विणकरांना आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करून घेण्यात यावे, येवला येथे कायमस्वरूपी वस्त्र मंत्रालयाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे. विणकर बांधवांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी येथे या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक करण्यात यावी, मास्टर विणकरांना किंवा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या विणकरांना व कारखानदारांना कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त प्रमाणात वित्तपुरवठा करण्यात यावा या मागण्यादेखील बाळासाहेब कापसे आणि मनोज दिवटे यांनी मांडल्या. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

श्रीमती इराणी यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. वस्त्र उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी कशा उपलब्ध आहेत, हे या वेळी त्यांनी विषद केले. वेबिनारमध्ये राज्यातील येवला, इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव, नागपूर, धुळे, भिवंडी, वडवणी आदी ठिकाणचे विणकर व वस्त्र उत्पादक घटक सहभागी झाले होते. 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For modernity, textile manufacturers should turn to other areas - Smriti Irani nashik marathi news