
नाशिक : (वाखारी) आजच्या काळात बरेच युवक डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा प्रकारच्या करिअरच्या वाटा निवडून आरामदायी जीवन जगण्याची स्वप्ने पाहत असतात व साकारत असतात; परंतु वाखारी व परिसरातील तरुणांचा ओढा संरक्षण दलाकडे जास्त असल्याचे दिसते.
कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत
या गावातून व जवळपासच्या परिसरातील 50 ते 60 तरुण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तसेच निमलष्करी दल, महाराष्ट्र पोलिस दलात देशाची सेवा निर्भीडपणे बजावत आहेत. संरक्षण दलात भरती होण्यासाठी मुले विद्यार्थिदशेपासूनच प्रयत्नांना सुरवात करतात. त्यात मैदानी चाचणीत धावणे, पुलअप्स, गोळाफेक, लांबउडी, उंचउडीचा सराव करताना दिसतात. महाविद्यालयातून एन.सी.सी.मध्ये प्रवेश घेऊन लष्कराचे प्राथमिक धडे घेत असतात. गावातील कुटुंबांचे उपजीविकेचे साधन शेती असल्याने बऱ्याचदा शेतीचे गणित कोलमडलेले असते. त्यामुळे शिक्षणासाठी भासणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन कमी वयात थोड्या शिक्षणात संरक्षण दलात चांगल्या पगाराची नोकरीची संधी मिळते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होते.
गावाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेले शहीद जवान रावसाहेब सोनजे यांचे स्मारक
सैन्यातून निवृत्त झाल्यावर बाहेर पुन्हा सरकारी व खासगी नोकरीत माजी सैनिक म्हणून आरक्षण मिळते. पुन्हा नोकरीच्या वाटा युवकांसाठी मोकळ्या होतात. सैन्यात भरती झालेले युवक सुटीवर घरी आल्यावर भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांना भरतीबाबत मार्गदर्शन करतात. वाखारी गावातील युवक प्रसंगी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन शत्रूला चोख प्रत्युत्तर देऊ शकतो, याची साक्ष गावाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेले शहीद जवान रावसाहेब सोनजे यांचे स्मारक देते. गावात जातांना आणि गावातून बाहेर निघतांना रावसाहेब सोनजे यांच्या स्मारकाकडे बघून आपल्यालाही देशासाठी काहीतरी करायचे आहे, अशी ऊर्जा युवकांमध्ये संचारते. गावातील सैन्यात भरती झालेल्या मुलांचे आई-वडील मोठ्या अभिमानाने सांगतात, की आमचा मुलगा आर्मीत आहे. अशाच प्रकारे वाखारी गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या खुंटेवाडी गावातूनही तरुणवर्ग देशाच्या संरक्षणात आपले कर्तव्य बजावत आहेत.
माझ्या वाखारी गावातील तरुण देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात कर्तव्य बजावत आहेत, ही माझ्यासाठी व आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अजून जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, त्यासाठी गावाला व्यायामशाळा उपलब्ध करण्यासाठी आमदारांकडे मागणी केली आहे. - डॉ. संजय शिरसाठ, उपसरपंच वाखारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.