हातमजुरी करणाऱ्या तरुणाला चौघांची मारहाण; सासऱ्याच्या दुकानासमोर जावयाचा खून

प्रमोद सावंत
Saturday, 19 September 2020

मोबाईल चोरीच्या आरोपावरून हातमजुरी करणाऱ्या तरुणाला पिता-पुत्रासह चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार केले.

नाशिक / मालेगाव  : शहरातील आयेशानगर भागात मोबाईल चोरीच्या आरोपावरून हातमजुरी करणाऱ्या तरुणाला पिता-पुत्रासह चौघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार केले. आयेशानगर भागातील गल्ली क्रमांक ९ येथे गुरुवारी (ता. १७) हा प्रकार घडला.

असा घडला प्रकार
चौघांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव सत्तार शेख इसाक (वय ३०, रा. गल्ली क्रमांक ९, घर क्रमांक २२०) असे आहे. सत्तारचे सासरे इसाक शाह यांच्या दुकानासमोरच त्यांच्या जावयाचा खून झाला. पोलिसांनी या खूनप्रकरणी तिघा संशयितांना रात्री अटक केली. सत्तार शेख याने मोबाईल चोरल्याचा आरोप करून त्याला बिसमिल्लानगरातील गल्ली क्रमांक पाच येथे राहणाऱ्या दाऊद शाह हैदर (६०), शाहरुख शाह दाऊद (२७) व साजीद शाह दाऊद (२३) या पिता-पुत्रासह एका अल्पवयीन तरुणाच्या मदतीने चौघांनी सत्तारला शिवीगाळ केली. त्यानंतर जमिनीवर पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत छातीला व डोक्याला जबर मुकामार लागल्याने तो जागीच ठार झाला.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

सासऱ्याच्या दुकानासमोर जावयाचा खून 

घटनेचे वृत्त समजताच अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी संशयितांची नावे घेऊन तातडीने त्यांचा शोध घेतला. अल्पवयीन तरुण वगळता शाहरुख, साजीद व दाऊद या तिघांना अटक केली. मृताची पत्नी परवीनबानो सत्तार शेख हिच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध रमजानपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder at malegaon nashik marathi news